Home विदर्भ बोनसचा दुसऱ्या टप्प्यात ३३६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

बोनसचा दुसऱ्या टप्प्यात ३३६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

0

गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती.मात्र, ५० टक्के बोनसची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पण खा. प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना ५० टक्के बोनसची रक्कम मिळेल, असा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला असून, राज्य सरकारने सोमवारी (दि. ६) बोनसचा दुसऱ्या टप्प्यात ३३६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस ५० क्विंटलपर्यंत देण्याची घोषणा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केली होती. खा. प्रफुल्ल पटेल हे शेतकऱ्यांना बोनस मिळण्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होेते. त्यांनी गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनस मिळणारच, अशी ग्वाही दिली होती. त्याची पूर्तता करीत खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३३६ कोटी रुपयांचा निधी बोनससाठी उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे आर्थिक संकटातील पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी, यासाठी माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे हे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. बोनसची रक्कम प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहेत.

…असे होणार बोनसच्या रकमेचे वितरण

मागील खरीप हंगामातील बोनसची ५० टक्के रक्कम शासनाकडे प्रलंबित होती. ती आता उपलब्ध करुन दिली असून, गोंदिया ११२ कोटी ३६ लाख, भंडारा १२८ कोटी १९ लाख, चंद्रपूर २७ कोटी ८० लाख, गडचिरोली २७ कोटी ७२ लाख, नागपूर १८ कोटी रुपये आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी असा एकूण ३३६ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

Exit mobile version