Home विदर्भ प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनी परत घेण्यासाठी कंपनीला नोटीस

प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनी परत घेण्यासाठी कंपनीला नोटीस

0

चंद्रपूर- मागील तीन वर्षांपासून जन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात कोरपना तालुक्यातील अंबुजा सिमेंट कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरू आहे. या लढय़ाला आता एक मोठे यश प्राप्त झालेले आहे. शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे अवर सचिव शहाजहान मुलानी यांच्या स्वाक्षरीने अंबुजा कंपनीला दि.६ सप्टेंबर रोजी ह्य२0 वर्षांपूर्वी शासनाने कंपनीसोबत केलेला भूसंपादन करार रद्द का करण्यात येऊ नये? असा कारणे दाखवा नोटीस पाठवून चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे. १९९९ मध्ये महाराष्ट्र शासना सोबत भूसंपादनाचा करार करताना तत्कालीन मराठा सिमेंट कंपनी म्हणजेच वर्तमान अंबुजा सिमेंट कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकरीमध्ये प्राधान्य देण्याचे करारात मान्य केले होते. कंपनीला मागितलेली माहिती वेळोवेळी शासन व प्रशासनाला पुरविण्याचेसुद्धा करारामध्ये नमूद होते. परंतु अंबुजा सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्तांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकरीमध्ये प्राधान्य देण्याचे टाळले.
प्रकल्पग्रस्तांनी कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून मागील तीन वर्षांपासून अनेक आक्रमक आंदोलने केली. या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी तत्कालीन जिल्हा भूसंपादन व पुनर्वसन अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांची एक सदस्यीय चौकशी समिती गठित केली. या समितीने अंबुजा सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनाकडे प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या रोजगाराबाबत वेळोवेळी सविस्तर लेखी माहिती मागितली. परंतु कंपनीने सदर माहिती देण्यास टाळाटाळ करून जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्तावित केलेल्या कारवाई नुसार कंपनी व्यवस्थापनाला भूसंपादन करार रद्द का करण्यात येऊ नये? असा कारणे दाखवा नोटीस देऊन चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे. या नोटीसीला कंपनी व्यवस्थापनाने समाधानकारक उत्तर न दिल्यास कंपनी सोबत केलेला भूसंपादन करार रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.अंबुजाने चार आठवड्यात या नोटीस चे समाधानकारक उत्तर न दिल्यास प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना २0 वषार्नंतर त्यांच्या जमिनी परत करण्याची नामुष्की अंबुजा सिमेंट कंपनीवर ओढवू शकते.
पत्रकार परिषदेत जन विकास सेनेचे , घनश्याम येरगुडे,इमदाद शेख, घनश्याम येरगुडे, मनीषा बोबडे, देवराव हटवार, प्रफुल बैरम, गीतेश शेंडे, निलेश पाझारे, किशोर महाजन, अंबुजा प्रकल्पग्रस्तचे आकाश लोंढे, सचिन पिंपळशेंडे, प्रविण मटाले, चंदू झाडे, तुषार निखाडे, संजय मोरे, निखील भोजेकर, संदीप वरारकर, सुनील बुटले, कवडु पंधरे, धनरु किन्नाके, नागू मेर्शाम, भाऊजी कुळमेथे, सुरेश मेर्शाम, विष्णू कुमरे, कमलेश मेर्शाम उपस्थित होते.

Exit mobile version