13661 स्रोतांचे परिक्षण एकाच दिवशी

0
24

जागतिक जलदिन : 16 ते 22 मार्च दरम्यान जल जागृती सप्ताहाचे आयोजन
—–
गोंदिया, ता. 15 : येत्या 22 मार्च रोजी जागतिक जलदिनानिमीत संपूर्ण जिल्हयात 16 ते 22 मार्च दरम्यान जागतिक जलदिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पाणी बचत, पाण्याचे महत्व, पाणी अडवा पाणी जिरवा, जलस्रोत व त्यांची सुरक्षितता आदी उपक्रामांवर सप्ताहांतर्गत भर राहणार असून; जिल्हयातील 13661 स्रोतांतील पाण्याचे FTK किटव्दारे परिक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात उद्या (ता. 16) सकाळी 11.00 वाजता जागतिक जलदिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  जिल्हधिकारी नयना गुंडे राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  नरेश भांडारकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  सुमित बेलपत्रे तथा जिल्हा व तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी मोठयासंख्येने उपस्थित राहतील. याप्रसंगी जलपूजन, जलप्रतिज्ञा तथा पाणी सुरक्षितेबाबत कार्यशाळा पार पडणार आहे. दरम्यान तालुकास्तरावर सुध्दा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून सप्ताहांतर्गत हर घर जल गाव घोषित करण्याच्या सुचना तथा पाणी पुरवठा असलेल्या गावांत सर्व घरांना नळ जोडणी देण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे. दरम्यान 17 मार्च रोजीपाणी वाचविण्याचा संकल्प करून जलप्रतिज्ञा घेणे, 18 मार्च रोजी ग्रामपंचायतीमध्ये पाणी बचतीचे, पाणी प्रदुषणाचे संदेश प्रसारीत करणे, जलसुरक्षकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतस्तरावर गृहभेटी करून गावक-यांना घरगुती पिण्याच्या पाण्याची साठवण, हाताळणी, पाणी अशुध्द होण्याची कारणे, स्त्रोत बळकळीकरणाबाबत माहिती देण्यात येईल. 20 मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता आणि पाण्याची टाकीची स्वच्छता करण्यात येईल. 21 मार्च रोजी ग्रामपंचायत स्तरावर विद्यार्थी, महिला बचत गटांच्या माध्यमातून जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजन, नळ जोडणी, पाणी पट्टी वसूली, पाणी बचत, शुध्द पिण्याचे पाणी, हात धुण्याची योग्य पध्दत आदी बाबत 5 म्हणी रंगविण्याचे, चित्रकला तथा निबंध स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दरम्यान 22 मार्च रोजी जिल्हयातील 13661 पाणी स्रोतांतील पिण्याच्या पाण्याची एफटीके किटद्वारे जलसुरक्षक आणि गावनिहाय प्रशिक्षित 5 महिलांच्या द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. पाणी हे जीवन आहे. त्याचे संवर्धन गरजेचे असून प्रत्येक कुटूंबाला शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कार्य करण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक जलदिनानिमीत्त प्रत्येक नागरीकांनी पाणी संवर्धनाचा तथा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचा संकल्प करण्याचे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी केले आहे.
——
धुळवडीला पाण्याचा अपव्यय टाळा
पाणी हे जीवन आहे. पाण्याची निमीती करता येत नाही. त्यामुळे त्याचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे. येत्या 17 मार्च रोजी जिल्हयात सर्वत्रच होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. धुळवडीला मोठयाप्रमाणात पाणी खेळले जाते. पाण्याचा अपव्यय केला जातो. यावेळी होळीला पाण्याचा अपव्यय करणार नाही, तथा गावातील पाण्याचे प्रदूषण होण्यापासून काळजी घेण्याचा तथा कोरडी होळी खेळण्याचा संकल्प करून प्रत्येक व्यक्तीने जल प्रतिज्ञा घ्यावी असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे