अर्जुनी मोरगाव,नगरपंचायत क्षेत्रात विविध प्रकल्प राबविले जातात.अर्जुनी ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले.नागरिकांना सुविधा आणि शहरात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी ब्रह्मपुरी नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि पाणी पुरवठा योजना प्रकल्पाचा अभ्यास दौरा नगरपंचायत चमूने केला. ब्रह्मपुरी नगरपरिषदेने शहरातील घन कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून मोठा प्रकल्प उभा केला आहे.याच धर्तीवर अर्जुनी नगरपंचायत अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यासाठी नगरपंचायत चे अध्यक्ष,नगरसेवक, मुख्याधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेला भेट दिली.
ब्रह्मपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर,स्वछता निरीक्षक आर. एस.ठोंबरे,नितिश रगडे आणि
शहर समन्वयक प्रविन काळे यांनी नगरपंचायत अर्जुनीच्या चमुला प्रकल्पाची माहिती दिली.ओला कचरा,सुका कचरा,प्लास्टिक,काच,कापड याचे योग्य व्यवस्थापन ब्रह्मपुरी नगरपरिषदेने केले आहे.या प्रकल्पांतर्गत गांडूळ खत,कंपोस्ट खत,बायोगॅस निर्मिती,दूषित पाण्याचे फिल्टरेशन करून त्या पाण्याचा झाडांसाठी वापर केला जातो.सहा एकर परिसरात पसरलेला हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अनेकांना रोजगार देणारा आहे. ब्रह्मपुरीमधील 34 लाख लिटर शुद्ध पिण्याच्या पाणी प्रकल्पाला चमूने भेट दिली. अर्जुनी नगरपंचायत अंतर्गत शहराचा विकास आराखडा तयार करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा अभ्यास दौरा करण्यात आला. त्यावेळी नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे, उपाध्यक्षा ललिता टेंभरे,मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव,सभापती दानेश साखरे, नगरसेवक एसकुमार शहारे, राधेश्याम भेंडारकर,अतुल बनसोड,अभिजीत कांबळे, नगरसेविका शीला उईके,इंदू लांजेवार,सुषमा दामले,प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव,सुरेश बोरीकर,महालगावचे उपसरपंच ओमप्रकाश नाईक आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.