
“>जि. प. सदस्य नेहा तुरकर यांच्या उपस्थितीत पोषण आहार अधिक्षकांनी केला पंचनामा
गोंंदिया :- जिल्ह्यातील वर्ग एक ते आठच्या विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात आलेल्या शालेय पोषण आहार धान्यात मोठ्या प्रमाणात कचरा, धूळ, सिमेंट व गुटख्याचे पाऊच आढळल्याने खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रार करूनही कुठलीच कारवाई करण्या आली नसल्याचे चंगेरा येथील उपसरंपच नजमा मुजीक खान यांनी सांगितले.त्यानंतर सदर प्रकरणाची तक्रार खा. प्रफुल्ल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, जि. प. सदस्य नेहा तुरकर यांचेकडे करण्यात आली.जि.प.सदस्य नेहा केतन तुरकर यांनी शाळेला भेट देत शालेय पोषण आहाराची पाहणी केल्यानंतर पोषण आहार अधिक्षकांना शाळेत पाचारण करुन शाळेत आलेल्या सर्व शालेय पोषण आहारातील निकृष्ट धान्याच्या पंचनामा करवून घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिाया तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंगेरा येथे 7 मार्च 2022 रोजी शालेय पोषण आहार कंत्राटदार श्री हरी राईस अंड ऍग्रो लिमिटेड, महालक्ष्मी राईस मिल जवळ गोविंदपूर रोड, गोंदिया यांचेकडून आँगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ अशा १५४ दिवसाचे शालेय पोषण आहाराचा धान्य पुरवठा करण्यात आला. त्या पोषण आहाराची पाहणी १० मार्च रोजी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी उपसरपंच नजमा मुजिक खान यांच्या उपस्थितीत केली असता त्यात मोठ्या प्रमाणात कचरा, धूळ, सिमेंट व गुटख्याचे पाऊच आढळून आले. त्यानंतर उपसरपंच नजमा खान यांनी 10 मार्च रोजी याची तक्रार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. मात्र, कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य नेहा केतन तुरकर यांनी आज 15 मार्च रोजी जि. प.शाळा चंगेरा येथे पोचून पोषण आहाराची पाहणी केली आणि लगेच भ्रमणध्वनीवरुन पोषण आहार पुरवठा अधिक्षक रहागंडाले यांना शाळेत पाचारण केले.रहागंडाले यांनी शाळेत पोचून पाहणी करुन निकृष्ठ धान्याचा पंचनामा केला. एक बोरा हरभरा व सहा बोरे मुंगदाळ निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी जि. प. सदस्य नेहा तुरकर, बिर्सोलाचे पंचायत समिती सदस्य, बनाथरचे केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. मार्च एंडिंगच्या नावावर शालेय कंत्राटदार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आता पुढे शालेय पोषण आहार कंत्राटदारावर कोणती कार्यवाही करण्यात येते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.