दुभंगलेल्या कुटुंबांना जुळवून बांधली रेशीमगाठ
ढाकणी येथील तंटामुक्त समिती ची किमया
गोंदिया -(ता.3) तंटामुक्त समिती ही केवळ गावातील नागरिकांचे तंटेच सोडवत नाही तर गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना नवी प्रेरणा देत असते. त्यातच आता दोन दुभंगलेल्या कुटुंबाची मने जुळवून त्यांच्या पाल्यांची लग्नगाठ बांधून देत समाजात एक आदर्श निर्माण केल्याची किमया गोंदिया तालुक्यातील ढाकणी येथील तंटा मुक्त समितीने घडवून आणली. तंटामुक्त समितीने केलेल्या समाजपयोगी कार्यासाठी या समितीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
ढाकणी येथील किरण राऊत नामक मुलाचे गोंदिया स्थित मीना नामक मुलीशी लग्न जुळले.या दोघांचा साखरपुडा त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या थाटामाटात उरकवला. तसेच मार्च महिन्याच्या शेवटची तारीख ठरवून त्यांच्या लग्नाचा बार हि उडविण्याची तयारी या दोन्ही वर वधूच्या कुटुंबियांनी आखली होती. परंतु लग्नाला दहा दिवस उरले असतानाच दोन्ही कुटुंबात बिनसले व सदर ठरलेले लग्न मोडीत काढण्याचे निश्चित झाले. बोहल्यावर चढण्यापूर्वीच भावी वर वधूचे स्वप्न भंगणार हि बाब निश्चित झाली. शुल्लक कारणासाठी लग्न मोडणे हि बाब भावी वर वधूंना पसंत पडली नाही.त्यामुळे त्यांनी सदर निर्णय मागे घेण्यासाठी आपल्या कुटुंबियांना पालथे घातले.परंतु कुटुंबियांनी भावी वर-वधूचे एकही म्हणणे ऐकून घेतले नाही.आणि शेवटी ठरलेले लग्न मोडीत ठरले. परंतु दोन्ही भावी वर-वधू यांनी यातून मार्ग काढण्यासाठी ढाकणी येथील तंटामुक्त समितीचे निमंत्रक प्रीतम मेश्राम यांच्याशी भेट घेऊन त्यांना आपली आपबीती कळविली व लग्न जुळवून आणण्याची विनंती केली. येथील तंटामुक्त समितीने तात्काळ याची दखल घेत दोन्ही कुटुंबांना पाचारण करून व त्यांचे समुपदेशन करीत मनोमिलन जुळवून आणले. व आपल्याच गावातील महादेव पहाडीवर गुरुवारी(ता.31) मोठ्या थाटामाटात सामाजिक रितिरिवाजाप्रमाणे दोन्ही कुटुंबीयांच्या साक्षीने दोन्ही जीवांची रेशीमगाठ बांधून दिली. यावेळी नवं वर-वधूना समिती तर्फे पाच जीवनावश्यक वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या. दुभंगलेल्या दोन्ही कुटुंबीयात मनोमिलन घडवून आणण्यासाठी या समितीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.या समाजपयोगी कार्यासाठी येथील तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष हंसराज लिल्हारे, निमंत्रक प्रीतम मेश्राम, सदस्य रवीशंकर मस्करे, देवलाल मस्करे, सुनिल हिरापुरे, सचिन पालादुरकर,ओमप्रकाश मेश्राम, मोहारे गुरुजी, सुनिल क्षीरसागर, सुदन नागपुरे, प्रफुल्ल ठवरे,भोजराज नागपुरे, कुवरलाल नागपुरे, अनिता डाहारे,मोहिनी मेश्राम, सतिकाबाई मेश्राम, जयवंता चनाप, अनेकसिंग बिरनवार यांनी मोलाचे सहकार्य केले.