
◆ युवक बिरादरी संस्थेचा उपक्रम
लाखनी:समर्थ महाविद्यालय लाखनी आणि युवक बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि दांडी स्मृतीच्या निमित्याने “एक सूर एक ताल” हा कार्यक्रम समर्थ महाविद्यालय येथील भगिनी निवेदिता सभागृह येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला युवक बिरादरीच्या पूर्व विदर्भ विभाग प्रकल्प संचालक सरिता फुंडे, रा. शि. संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे, ज्येष्ठ बिरादर वर्षा मनोज दाढी, युवक बिरादरीचे कार्य. प्रकल्प प्रमुख प्रशांत वाघाये, निदेशक नागेंद्र राय प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने “एक सूर एक ताल” हा कार्यक्रम महाराष्ट्रात २० जिल्ह्यात घेण्यात येत आहे. यामध्ये समर्थ महाविद्यालयातील ५०० विद्यार्थ्याना युवक बिरादरीच्या वतीने देशातील विविध भाषांमधील गीत, गायन, नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले गेले.
देशाच्या विविध भागातून आपल्या कलेमध्ये प्रवीण असलेल्या कलाकारांची विशेष उपस्थिती होती. यात गायक अतुल सुंदरकर, एकता जोशी, नृत्य कलेत पारंगत असलेले अक्षय जाधव, सरिता बाला, हेमांगी पीसाट, तनाया प्रभु, राजेय वतनदार, राकेश चव्हाण, विजय घरणिया, वाद्यवृंद कृष्णा रत्नपारखी, पंकज उनोने, प्रवीण पवार यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करत प्रशिक्षण दिले. पाणी हे जीवन आहे त्याचबरोबर ऊर्जेचे महत्त्व, स्वच्छता, सामाजिक ऐक्य अशे विविध महत्वपूर्ण संदेश देणारी तीन नृत्य देखील याप्रसंगी कलाकारांनी सादर केले. या माध्यमातून समाजातील अत्यंत ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधत त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे असा संदेशही दिला. ‘प्यारा हर इंसान यारा, प्यार अपनी जिंदगी’ या अतिशय सुंदर कव्वालीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आणि विविध भाषांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावणारा “एक सूर एक ताल” हा युवक बिरादरीचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम असून आजवर हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांमध्ये झालेला आहे. या कार्यक्रमासह ‘हिरवे अंगण’, आणि ‘घरपणातिल नायिका’ या दोन अभियानाचा शुभारंभ देखील युवक बिरादरीच्या वतीने करण्यात आलेला आहे. या दोन्ही उपक्रमांची सविस्तर माहिती प्रशांत वाघाये यांनी यावेळी दिली. वृक्षारोपणापासून तर विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये कलागुण विकसित करण्यासाठी युवक बिरादरी सातत्याने प्रयत्नरत आहेत.
अत्यंत सुंदर आणि शिस्तबद्ध असलेला कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी स्वतःहून सक्रीय सहभाग नोंदविला. याप्रसंगी आल्हाद भांडारकर यांनी यापुढे तालुक्यातील 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांना एकत्रित करून हा उपक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला. युवक बिरादरी युवक चळवळीसाठी कायम प्रयत्न करत आहे, युवक बिरादरीच्या विविध उपक्रमांमध्ये आपल्या भागातील कार्य उत्कृष्ट राहील यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे प्रतिपादन सरिता फुंडे यांनी केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहेत असं म्हणत युवक बिरादरीच्या सर्व उपक्रमांना डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना एक अतिशय चांगला कार्यक्रम महाविद्यालयात झाला त्याबद्दल युवक बिरादरीचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांनी व्यक्त केले.
सर्व कलाकारांचा स्वागत सत्कार याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य भांडारकर, संचालन नागेंद्र राय आणि आभार डॉ. दिगांबर कापसे यांनी मानले.