खासदार मेंढे यांची मंत्र्यांशी चर्चा : लवकरच बैठक घेवून काढणार मार्गी
गोंदिया, . भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या. बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करून नवीन काही एक्सप्रेस गाड्यांचे थांबे भंडारा आणि गोंदिया येथे देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटून दिले. विशेष म्हणजे भंडारा गोंदिया रेल्वे स्थानकाच्या अनुषंगाने असलेल्या समस्या सोडविण्यासाठी विस्तारित बैठक घेण्याची मागणी खासदारांनी केल्यानंतर प्रतिसाद देत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले आहे.
दिल्ली येथे खासदार सुनील मेंढे यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान गोंदिया आणि भंडारा रेल्वे स्थानकाच्या अनुषंगाने विविध मागण्यांचे निवेदन दिले.. 1878 मध्ये गोंदिया रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. 7 प्लॅटफॉर्म असलेले हे रेल्वे स्थानक दिल्ली ते चेन्नई यांच्यातील अंतर 250 किलोमीटर ने कमी करण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आले होते. नागपूर ते तुमसर लाईनचे उद्घाटन 1880 मध्ये करून 1988 मध्ये सामान्य जनतेसाठी खुली करण्यात आली. ज्या सात रेल्वे स्थानकांचा कोड हा केवळ अक्षरासोबत आहे. त्यापैकी गोंदिया हे एक असून अ वर्गवारीत मोडणारे स्टेशन आहे. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेला असलेले द्वार, तिकीट घर, अत्याधुनिक सुविधायुक्त प्रतीक्षालय, अतिक्रमित जागेत असलेली पार्किंग सुविधा आणि गुड हाऊस हे स्थानांतरित करून गोंदिया एमआयडीसी परिसरात मुंडीपार येथे तयार करण्यात यावे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक-8 ची निर्मिती केली केली जावी व हा सर्व परिसर अत्याधुनिक एक सोयी सुविधांनी युक्त असा करण्यात यावा अशी मागणी खासदारांनी केली. रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करून बोटिंग पार्क तयार करण्यात यावे, अशी मागणी केली.
या मागण्याही कराव्या पूर्ण
सुरू असलेल्या काही पॅसेंजर गाड्या आणि नवीन गाड्यांना थांबा देण्याच्या अनुषंगानेही या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. गोंदिया इतवारी स्टेशन दरम्यान पाच पॅसेंजर गाड्या धावत होत्या. आज एक धावते आहे. गोंदिया दुर्ग दरम्यान चालणाऱ्या सहा गाड्यांपैकी दोन गाड्या धावत आहे. गोंदिया – चंद्रपूर चार पैकी दोन, गोंदिया कटंगी आठ पैकी पाच अशा गाड्या सुरु आहेत. यापूर्वी प्रमाणे पूर्ण फेऱ्या चालविण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे. शालिमार, पुरी एलटीटी या गाड्यांना भंडारा-गोंदिया येथे दरभंगा एक्सप्रेस, गया चेन्नई गाड्यांना सौंदड आणि अर्जुनी मोरगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा तसेच हरिद्वार जबलपूर एक्सप्रेस गोंदिया पर्यंत विस्तारित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. गोंदिया ते प्रयागराज गाडी बालाघाट मार्गाने चालविण्यात यावी या मागणीचा ही समावेश खासदारांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.