
प्रभारी पदाचे ग्रहण संपुष्टात : सिटी सर्व्हेचा तिढा सुटणार
देसाईगंज,दि.२७-गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात पहिली नगरपरीषद, सर्वात मोठी बाजारपेठ व जिल्ह्यात एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज तालुका भुमी अभिलेख कार्यालय ३० जानेवारी २०२० पासुन प्रभारी उप अधीक्षकाच्या भरोसे सुरू होते. परंतु तब्बल अडीच वर्षांनंतर आज ता. २७ मे २०२२ ला शासनाच्या महसूल व वन विभागाने पदोन्नतीने नियमित उप अधीक्षक दिल्याने मागील अडीच वर्षांपासून बहुप्रतीक्षित सिटी सर्व्हे व प्रलंबित कामांचा निपटारा तातडीने सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शासनाच्या महसुल व वन विभागाने भुमी अभिलेख विभागातील गट क पदसमुह -२ मधुन उप अधीक्षक गट ब संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत २७ मे २०२२ ला राज्यातील ७६ उप अधिक्षक भुमी अभिलेख या पदावर पदोन्नत झालेल्या अधिका-यांची सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदोन्नतीने पदस्थापना करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. या पदोन्नती आदेशात मागील अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या देसाईगंज तालुका भुमी अभिलेख कार्यालयात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नागपूर येथे शिरस्तेदार या पदावर कार्यरत असलेले अमोल पुरुषोत्तम बुधे यांची उप अधीक्षक तालुका भुमी अभिलेख या पदावर पदोन्नती बदली करण्यात आली आहे.
दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कारभार मागील अडीच वर्षांपासून प्रतिनियुक्तीवरच सुरु असल्याने देसाईगंज भुमी अभिलेख कार्यालयात अनेक कामे प्रलंबित असून यात शेत शिवाराच्या तक्रारी अर्ज, पोटहिस्सा व हद्द कायम करण्याचे मोजणी प्रकरण , गांव ठाण मोजणी, बहुप्रतीक्षित सिटी सर्वेच्या शहरातील मिळकतीच्या मोजणी नुसार अभिलेख तपासणी च्या कामाला प्रत्येक्ष सुरुवात करुन शहरातील नागरिकांना मिळकतीची सनद व नकाशा आता तरी लवकरच मिळतील अशी आशा व्यक्त केल्या जात आहे.