वाशिम, दि. 10 : जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र आणि ओळखपत्राचे वाटप आज 10 जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, प्रा.डॉ. पौर्णिमा संधानी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाट, ॲड.जाधव, डॉ. मुसळे व तृतीयपंथी आरती चौधरी यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
श्री. खडसे म्हणाले, तृतीयपंथीयाकडे समाज तिरस्काराच्या भावनेतून बघतो. तृतीय पंथीय हा सुध्दा समाजाचा घटक आहे. समाजाने त्यांना आपुलकी आणि प्रेमाची वागणूक दिली तर तृतीयपंथीय व्यक्तीला सुध्दा वाटेल की समाज आपल्या प्रती बदलत आहे. तृतीयपंथीयांनी हा विचार केला असेल की आपल्या जन्मदात्या आईवडिलांनी आपल्याला नाकारले आणि वाऱ्यावर सोडले. शासन तरी आपल्याला काय मदत करणार ही भावना तृतीयपंथीयांची असेल परंतू तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरणाच्या या कार्यक्रमातून दिसून येते. राज्यातील तृतीयपंथीयांचे कल्याण आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण करुन विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी विविध नाविन्यपूर्ण आणि कौशल्य विकासाच्या योजना शासन राबविणार असून तृतीयपंथीयांनी या योजनांचा लाभ घेवून आपला विकास साधावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रा. डॉ. श्रीमती संधानी म्हणाल्या, तृतीयपंथीय हा हिजडा म्हणून समाजात ओळखला जातो. हिजडा म्हणजे आपला समाज सोडलेला. तृतीयपंथी हा समाजातील दुर्लक्षीत घटक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्लक्षीत असलेल्या तृतीयपंथीयांची शासनाने दखल घेतली आहे. तृतीयपंथीयांचे अनेक प्रश्न आहेत. तृतीयपंथीयांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले तर ते नक्कीच शिक्षण घेतील. चांगले शिक्षण घेवून समाजाचे त्यांना चांगले सहकार्य मिळाले तर एखादा उद्योग व्यवसाय सुरु करुन ते स्वावलंबी होतील. त्यांना लोकांपुढे पैशासाठी हात पसरण्याची वेळ येणार नाही. शासनाच्या या योजनेमुळे त्यांच्या विकासाला गती मिळेल असे त्या म्हणाल्या.
श्री. वाठ म्हणाले, समाजाच्या सापत्न वागणूकीमुळे हा समाज विकासापासून दुर्लक्षित वंचित राहीला आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या नाविन्यपूर्ण व कौशल्य विकासाच्या योजनांवर लक्ष देण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांनी भविष्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाच्या दृष्टीने नॅशलन पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर परर्सन या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करुन प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे. जिल्ह्यात आतापर्यत 5 तृतीपंथीयांनी या पोर्टलवर अर्ज करुन प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त केले आहे. तृतीयपंथीयांनी ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
ॲड. जाधव यांनी कायदेविषयक माहिती दिली. तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, प्रत्येक तृतीयपंथीयाने ओळखपत्र काढले पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. तृतीयपंथियांमध्ये जात नाही. तृतीयपंथीयांनी आपली ओळख निर्माण केली पाहिजे. समाजातील समस्याग्रस्त व अडीअडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी तृतीयपंथीयांनी पुढे आले पाहिजे. असे त्या म्हणाल्या. यावेळी. तृतीयपंथी आरती चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
समाज कल्याण विभाग वाशिम आणि श्री सत्यसाई सेवा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक मंडळ खडगांव ता. चाळीसगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीयांचे कल्याण व त्यांच्या हक्काचे संरक्षण करणे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच तृतीय पंथीयांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, तृतीयपंथीय व्यक्ती, समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी व मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार समाज कल्याण निरीक्षक संध्या राठोड यांनी मानले. संचालन प्रा. डॉ. संजय साळवे यांनी केले.