
भंड़ारा,दि.28ः “नरसेवा हीच नारायण सेवा” हे ब्रीद वाक्य ठरवून थोरांचे आदर्श समोर ठेवत, ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर, काम करीत आहे. निरपेक्ष व परोपकारी दृष्टीतून जनसेवा करणे हाच उद्देश समोर ठेवून, प्रकल्प दर्शन भेट यात्रा (सहल) हा उपक्रम ग्रामायण प्रतिष्ठान तर्फे राबविल्या जातो.याच अंतर्गत दिनांक २६ जुन २०२२ ला भंडारा जिल्यातील सहा प्रकल्पांना भेटी देण्यात आल्यात.
“महाराष्ट्राच्या पूर्वक क्षितिजी, चमचम चमके तारा | आमचा भंडारा, हा तर आमचा भंडारा| असं वर्णन केला आहे कवी श्री बोरकर यांनी. तांदूळ, पितळी भांडे, तलावांचा, जंगलाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्हा नावाजलेला आहे. जिल्हात तलावांची संख्या जास्त असल्याने मत्स्यशेती केली जाते.
ग्रामायन तर्फे आयोजीत या प्रकल्प दर्शन सहलीत ३३ प्रकल्पदर्शी सहभागी झाले होते. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील श्री राजेशजी गायधने याचा वेखंड शेती प्रकल्प, शिरेगावबांध येथील महिला उद्योजिका सौ. रचानाताई गहाने, यांचा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित “शिवणकाम उद्योग” तसेच उदबत्ती तयार करण्याचा प्रकल्प, साकोली येथील भटके विमुक्त कल्याणकारी संस्थे तर्फे चालविण्यात येणारी “पालावरची शाळा”, भंडारा येथील श्री महादेव सातोने सरांनी जोपासलेला कला प्रकल्प, आंधळगाव येथील श्री रामेश्वरजी गोखले यांचा “कोसा कापड निर्मिती” प्रकल्प आणि “गोड्या पाण्यातील मासे” यावर डॉ. उल्हासजी फडके यांचे मार्गदर्शन व शेवटी भंडारा शहराचे ग्रामदैवत तसेच विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक श्री भृशुंड गणेश मंदिर दर्शन घेण्यात आले.
विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनेक लोक स्वतः पुढाकार घेवून समाजपूरक ग्राम विकासात भरीव योगदान देत आहेत. याच उद्देशाने कित्येक समर्पित व्यक्ती, संस्था तन मन धनाने अविरत कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याला भेट द्यावी, ते समजून घ्यावे तसेच यामुळे कदाचित आपल्याला सुद्धा यातून काही नव्या उद्योगाची किंवा समाज कार्याची प्रेरणा मिळू शकेल. त्याच बरोबर ग्रामीण उद्योजकांच्या वस्तूंना तांत्रिक मदत आणि बाजारपेठ मिळू शकेल व ते एक समाज कार्यच होईल. मागील वर्षी वर्धा जिल्हा व यवतमाळ जिल्हात प्रकल्प भेट यात्रा यशस्वी पणे पुर्ण केली. या वेळी भंडारा जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना भेटी देवून अनेक शेतकरी, उद्योजक, सामाजिक संस्था यांचे कार्य जवळून अनुभवता आले.
ग्रामयण प्रतिष्ठानच्या पुढाकाराने अशा सहलींचे आयोजने होत असते. या प्रकल्प भेट सहलीला समाजातील विविध क्षेत्रातील, तरुणांपासून ते सत्तरीच्या घरातील मंडळीनी उत्सुकतेने खूप काही जाणून घेतलं. साकोलीच्या पालावरच्या शाळेत भटके विमुक्त कल्याणकारी संस्थेची माहिती, उपक्रम या संबंधी श्रीकांत तिजारे यांनी माहिती दिली. तसेच प्रकल्पदर्शी डॉ. शारदा वैद्य यांनी मुलांसोबत संवाद साधताना बोधप्रद गोष्टी सांगितल्या.
ही प्रकल्प दर्शन अधिक सुकर व्हावे यासाठी ग्रामायनचे नंदकुमार दिक्षित, प्रसाद बर्वे व मिलिंद गिरिपुंजे यांचे सोबत भंडारा येथील महादेव साटोने, राजेंद्र दोनाडकर, श्रीकांत तिजारे, साकोलीचे कार्यकर्ते राहुल आवरकर, शरद सोनकुसरे, यांनी प्रकल्प भेट यात्रेसाठी कार्य केले.