Home विदर्भ रेन वॉटर हार्वेस्टींग मोहीमेला मिळणारा प्रतिसाद उत्कृष्ट – अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल

रेन वॉटर हार्वेस्टींग मोहीमेला मिळणारा प्रतिसाद उत्कृष्ट – अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल

0

रेन वॉटर हार्वेस्टींग मार्गदर्शन सभा

 चंद्रपूर २९ जुन –  चंद्रपूर शहरात आता रेन वॉटर हार्वेस्टींग मोहिमेने जोर पकडला असुन इतर शहरांच्या तुलनेत चंद्रपूर महानगरपालिकेस मिळणारा प्रतिसाद उत्कृष्ट आहे. व्यापारी संघटना, हॉटेल संचालक, मंगल कार्यालय, धार्मिक स्थळांचे प्रतिनिधींनी मोहीमेस सहकार्य केल्यास शहरातील पाणी पातळी वाढविण्याचा मोठा टप्पा आपण गाठु शकतो असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी मार्गदर्शन सभेत केले.
भूगर्भातील पाण्याची सातत्याने घट होत असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे करणे आवश्यक आहे. रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यास प्रतिवर्षी १ लाख लिटर पावसाचे पाणी आपण वाचवु शकतो. विहीर, बोअरवेल करतांना जमीन खोदण्याची पातळी ही अधिकाधिक खोलावत आहे. पुढे पाणी हवे असल्यास आताच पाण्याचा साठा रेन वॉटर हार्वेस्टींगच्या माध्यमातुन प्रत्येक घरी करणे आवश्यक आहे.
सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे ही येणाऱ्या भाविकांसाठी श्रद्धेय असतात. मोठ्या धार्मिक स्थळांनी जर छोट्या धार्मिक स्थळांना मदत केली तर प्रत्येक धार्मिक स्थळ हे रेन वॉटर हार्वेस्टींग युक्त बनेल व प्रार्थना करण्यास येणारी प्रत्येक व्यक्ती रेन वॉटर हार्वेस्टींग आपल्या घरी करण्यास उद्युक्त होईल. व्यापारी संघटना हॉटेल संचालक, मंगल कार्यालय संचालक यांनी आपले प्रतिष्ठानांवर ही यंत्रणा बसवून घ्यावी व जनजागृती करावी.
या प्रसंगी व्यापारी संघटना व हॉटेल संचालक यांनी रेन वॉटर हार्वेस्टींग करणाऱ्या नागरीकांसाठी डिस्काउंट कुपन देऊन सहकार्य करु असे सांगितले. बैठकीस सहायक आयुक्त विद्या पाटील, शहरातील व्यापारी संघटना, हॉटेल संचालक, मंगल कार्यालय, धार्मिक स्थळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version