
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच ते उद्दिष्ट पूर्ण झाले. प्रत्यक्षात खर्या शेतकर्यांच्या सातबाराची नोंदणी न होता बोगस सातबारे नोंदवून व्यापार्यांचे हित साधण्याचे यातून स्पष्ट होते. खर्या शेतकर्यांच्या सातबाराचे लॉट अपलोड न करता धान केंद्र चालक स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व्यापा-यांच्या सातब-यांचे लॉट अपलोड करतात. अधिका अधिक व्यापारी हेच धान केंद्र चालक आहेत. कमी वेळात क्षमतेपेक्षा जास्त खरेदी करून केंद्र चालकांनी घोळ झाल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे अशा केंद्र चालकांवर ताबडतोब कारवाई करावी व शेतकर्यांनीही केंद्र चालकांच्या विरोधात तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने चुकीच्या पेरणी अहवाला मुळे भंडारा गोंदिया जिल्ह्याला धान खरेदीचे उद्दिष्ट कमी मिळाले होते. खासदार सुनील मेंढे यांनी प्रयत्न करून सततच्या पाठपुराव्यानंतर ते वाढवून घेतले. चार दिवसांपूर्वी केंद्राने राज्याचे उद्दिष्ट वाढवून दिल्याचे पत्र काढले होते. भंडारा जिल्ह्यासाठी सहा लाख ४१ हजार क्विंटल वाढीव उद्दिष्ट देण्यात आले होते. या खरेदीसाठी सात जुलै च्या दुपारी बारा वाजता पासून सुरुवात झाली. परंतु, संध्याकाळ पयर्ंत खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होऊन पोर्टल बंद झाले.
अनेक केंद्रांवर क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले. तीन हजारापासून ते पंधरा हजार क्विंटल पयर्ंत ची खरेदी काही तासात एकेका केंद्रावर झाल्याने धान खरेदीच्या बाबतीत प्रचंड घोळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यापार्यांनी दिलेले बोगस सातबारा धान केंद्रावर नोंदविल्या गेल्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली आहे. यामुळे खरे शेतकरी पुन्हा धानविक्रीपासून वंचित राहिले आहेत. ज्यांच्या साठी उद्दिष्ट वाढवून घेतले होते ते साध्य न होता बोगस सातबाराच्या माध्यमातून व्यापार्यांची हित साधण्याचा प्रयत्न धान केंद्र संचालकांनी केला आहे. अशा केंद्र संचालकांवर ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग अधिकार्याला दिल्याचे खासदारांनी स्पष्ट केले. सोबतच धान खरेदी केंद्रावर नोंदणी झालेल्या शेतकर्यांची यादी घेऊन ती बोगस असल्यास अशा केंद्र संचालकांचे विरोधात तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहनही खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.