आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांची होणार दर्जोन्नती
गोंदिया : जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आदिवासी क्षेत्रातील प्रस्तावित विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी खा.पटेलांकडे केली होती. त्यानुरूप अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा.प्रफुल पटेल यांनी वित्त मंत्रालय व आदिवासी विकास मंत्रालयाशी पाठपुरावा करून विकासकामे मंजूर करवून घेतली आहेत. यासाठी शासनाने ९.५० कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व सालेकसा या आदिवासी क्षेत्रातील रस्ता दर्जोन्नतीचे कामे होणार आहेत.
या निधीतून रस्ता दर्जोन्नतीची कामे करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.विशेष म्हणजे अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या दोन तालुक्यात जवळपास २९ विकासकामे केली जाणार आहेत.विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी बहुल क्षेत्रातील नागरिकांच्या दळणवळण विषयक समस्या मार्गी लागून दिलासा मिळणार, असे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केले आहे.
या कामांचा समावेश
मंजूर झालेल्या निधीतून करण्यात येणार्या विकासकामांमध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरततोंडी-कोरंभी, प्रतापगड-खोकरी, बोंडगाव-गांधारी, कढोली-बोंडगाव, रामनगर-संजयनगर, पांढरवाणी माल – झोडेटोली, गोठणगाव – आश्रमशाळा, झाशीनगर जोडमार्ग, प्रतापगड-खोकरी, बोंडगाव-गांधारी, कढोली-बोंडगाव, रामनगर-संजयनगर, पांढरवाणी माल – झोडेटोली, सडक अर्जुनी तालुक्यातील बेहळीटोला जोड रस्ता, माहुली-बिर्री, धानोरी-चिचटोला, धानोरी-लेंडेझरी, टेकरीपार जोड रस्ता, कोकणा-परसोडी, रेंगेपार-मोकाशिटोला, खोबा-गोंविदखोबा, कोकणा बायपास मार्ग, रामकनेरी-कोकणा, पाथरगोठा-कन्हारटोला, आंभोरा-परसटोला, केळवद-गवर्राटोला, केळवद-गवर्राटोला, केळवद-गवर्राटोला तसेच सालेकसा तालुक्यातील कारूटोला-चिचटोला व रामाटोला-कुलभरट्टी या रस्ता बांधकामाचा समावेश आहे.