औद्योगिक विकासाकरीता उत्पादने व निर्यात विविधीकरण आवश्यक – विजया बनकर

0
111

गोंदिया, दि.9: जिल्ह्यात भात पिकाचे उत्पादन व निर्यात मोठ्या प्रमाणात होत असली तरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाकरिता वनोत्पादने, पर्यावरणपूरक जैविक शेती व पर्यटन यासारख्या क्षेत्रांवर भर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी केले. शासन उद्योजकांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यास सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

        जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज उद्योजकांकरीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी उद्योग उपसंचालक बी.एम.शिवणकर व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सारंग पटले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

       गोंदिया जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या MSME क्षेत्रावर भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार व स्वयंरोगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यात वृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगांच्या विकासासाठी राज्य तसेच केंद्र शासनाच्या विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत, त्या सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टिने 9 जुलै 2024 रोजी “IGNITE MAHARASHTRA-2024” कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे करण्यात आले होते.

        कार्यशाळेत मैत्रीचे नोडल अधिकारी सागर औटी यांनी मैत्री कायदा व पोर्टल हे उद्योगांकरिता कसे सहाय्यभूत आहे याची सविस्तर माहिती दिली. DGFT तर्फे जिल्ह्यातील उत्पादनांची निर्यात क्षमता वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच निर्यात योजनांची विस्तृत माहिती देण्यात आली. SIDBI च्या व्यवस्थापक श्रीमती बोदेले यांनी MSME करिता SIDBI च्या योजनांची माहिती दिली तर IDBI चे श्री. निर्वाणेश्वर यांनी IDBI चे उद्योग क्षेत्रासाठी असणाऱ्या योजनांची माहिती दिली. CFTRI संस्थेचे दयाल कुमार आहुजा यांनी अन्नप्रक्रिया क्षेत्रातील उपलब्ध विविध संधींविषयी मार्गदर्शन केले. ZED Trainer मनिष तिवारी यांनी उद्योजकांना ZED प्रमाणीकरणाचे फायदे सांगितले.

        न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीचे श्री. अमृतकर व श्रीमती गोमती यांनी MSME करिता कंपनीच्या विमा योजनांची माहिती दिली. धीरज कुमार, डेव्हलपमेंट ऑफिसर ONDC यांनी लहान उद्योगांना डिजिटल प्लेटफार्म हे त्यांचे विक्रीसाठी कसे आवश्यक व उपयोगी आहेत याविषयी माहिती दिली. मुख्य डाकघर गोंदियाचे सहायक अधीक्षक आशिष बन्सोड यांनी डाक निर्यात केंद्र योजनेची महिती उपस्थितांना दिली.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग उपसंचालक बी.एम.शिवणकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सारंग पटले यांनी मानले. कार्यशाळेस जवळपास 200 उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, क्लस्टरचे प्रतिनिधी, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.