आमदार फुके यांची कृषिमंत्री सत्तार यांच्याकडे मागणी

0
42

भंडारा :- भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. दोन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. धान व इतर पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या गंभीर बाबीबाबत आमदार डॉ.परिणय फुके यांनी नागपूर येथे शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन पिकांच्या नासाडीबाबत सविस्तर माहिती दिली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी केली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबतची ही बैठक विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे घेण्यात आली. यावेळी गोंदिया-भंडारा विधानपरिषद क्षेत्राचे आमदार डॉ.परिणय फुके, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, खासदार, भंडारा जिल्हा कृषि अधिकारी बलसाने, गोंदिया जिल्हा कृषी अधिकारी चव्हाण उपस्थित होते. आमदार फुके यांनी दोन्ही जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती कृषिमंत्र्यांना दिली. ते म्हणाले, भंडारा आणि गोंदिया जिल्हे पुरामुळे बुडाले आहेत. पिके नष्ट झाली आहेत. तसेच मागील सरकारच्या काळात धान उत्पादनाचे आकडे कमी दाखविल्याने केंद्र सरकारने धान उत्पादन क्षमतेचे उद्दिष्ट कमी केले होते, असेही ते म्हणाले. अजूनही ५० टक्के धानाची खरेदी झाली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटातून जात आहे. उर्वरित ५० टक्के धान केंद्र शासनाने राज्य शासनामार्फत खरेदी करण्याचे उद्दिष्ट वाढवावे, तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची त्वरीत भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार डॉ.परिणय फुके यांनी कृषिमंत्री सत्तार यांच्याकडे केली. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींच्या बाबींची गांभीर्याने दखल घेत दोन्ही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल लवकर पाठवा, अशा कडक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.