गोंदिया विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी संपादक मंडळाची नियुक्ती

0
50

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमर्यादीतची निवड

रात्रकालीन सेवा व धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी रस्ते वळतीकरण होणार
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.01ः येथील बिरसी विमानतळातून मार्च महिन्यात घरगुती उड्डाण सेवा सुरू झाली आहे.त्यातच आधीपासूनच याठिकाणी शासकीय  व निमशासकीय पायलट प्रशिक्षण केंद्र अस्तित्वात आलेले आहे.मात्र् विमानतळाच्या परिसरातूनच राज्य महामार्ग असलेला खातीया बिरसी कामठा व कामठा परसवाडा हा जिल्हा मार्ग जात आहे.या दोन्ही मार्गामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न काही वर्षापासून रेंगाळलेला होता.त्या प्रश्नाला सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आज 1 सप्टेंबरला शासन निर्णय काढत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला गोंदियाच्या बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी संपादक मंडळ म्हणून नियुक्त केले आहे.विशेष म्हणजे या दोन्ही मार्गामुळे विमानतळावरुन रात्रीकालीन सेवेसोबतच एयरबस 320 उड्डाणाकरीता अडचणी येत असल्याचे पत्र भारतीय विमानपतनन प्राधिकरणाने महाराष्ट्र सरकारला कळवले होते.त्या पत्राच्या अनुषगांनेच हा निर्णय घेण्यात आला असून दोन्ही रस्त्यांचे लवकरच वळतीकरण करुन धावपट्टीसंबधातील इतर अडचणी सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव म.की.वाव्हळ यांनी म्हटले आहे.सोबतच आवश्यक भारविरहीत  जमिन उपलब्ध करुन देण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिऐशनने बिरसी विमानतळाची तपासणी केल्यानंतर या विमानतळावरुन 13 मार्च रोजी पहिले प्रवासी विमान हैद्राबादकरीता रवाना झाले होते.मात्र या ठिकाणी पायलट प्रशिक्षण अकादमी असल्याने आणि रात्रीला विमान उतरण्याची सुविधा काढून घेण्यात आल्याने अनेकदा गोंदिया हैद्राबाद इंदोर विमानसेवेला फटका बसला होता.त्या सर्व गोष्टींचा आढावा घेत तसेच विमानतळाशेजारील राज्य व जिल्हा मार्गामुळे धावपट्टी विस्तारीकरणात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने हे अडथळे दूर करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादीत कंपनीला संपादक मंडळ म्हणून नियुक्त केले आहे.

केंद्र सरकारने छोट्या आणि मध्यम शहरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘उड्डाण योजना’ सुरू केली आहे. याअंर्तगत ७८ नव्या मार्गांवर उड्डाण योजनेला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये गोंदिया विमानतळाचा समावेश होता. त्यानुसार बिरसी विमानतळावरुन हैद्राबाद इंदोर विमान सेवा सुरु करण्यात आली.तर भविष्यात गोंदिया औरगांबाद हैद्राबाद व मुंबई विमानसेवेचा विस्तारीकरणाचा प्रस्ताव असल्याने धावपट्टी व रात्रकालीन सेवेच्या सुविधा महत्वाच्या असल्याचे भारतीय विमानपतनन प्राधिकरणाने म्हटले आहे.