**नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची शासकीय योजना थंडबस्त्यात*
सडक अर्जुनी:::— पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत मुरपार/ लेंडेझरी मध्ये सन२०१३-१४ मध्ये जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजना अंतर्गत मंजूर झालेले नळ योजनेचे बांधकाम सुरू झाले. सदर पाणीपुरवठा बांधकाम उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय नवेगावबांध अंतर्गत करण्यात आले.परंतू ते काम कंत्राटदाराने सन २०१४-१५ मध्ये अर्धवट करून पूर्ण न करता कामाचे मोजमाप दाखवून २० लाख ३५ हजार रुपयांचे काम झाल्याचे दाखविले.ग्रामपंचायत सचिव व कंत्राटदार या दोघांनी १३-१४ महिन्यात मोक्यावर १० लाखांचे काम झाले नसून सुध्दा पैशाची उचल केली.कंत्राटदार व तत्कालीन ग्रामपंचायत सचिव सी .एस.हलाले यांनी संगनमत करून २० लाख३५ हजार रूपयांचा धनादेशाची उचल केल्याचे १७ मार्च २०१७ रोजी स्पष्ट झाले होते.या कामासाठी ४० लाख रुपये मंजूर झाले होते.परंतू आजही सदर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नसून विहीरीचे खोदकाम न करता पंप खरेदी कागदावर दाखविली आहे.आज सात वर्षे लोटून सुद्धा ग्रामवासीयांना शुद्ध पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही.आजही सदर पाणीपुरवठा योजना मुरपार/ लेंडेझरी ग्रामवासीयांना पांढरा हत्ती ठरलेला आहे.आणि दुसरीकडे गटग्रामपंचायत असल्याने लेंडेझरी येथील नागरिकांनी गाव वर्गणी गोळा करून वीज कनेक्शन घेऊन व मोटार घेऊन विहीरीवर बसवून संपूर्ण गावाला विहीरीद्वारे पाणीपुरवठा करीत आहेत. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी केंद्र व राज्य शासनाची दिशाभूल करून शुध्द पाणी पुरवठा करीत असल्याचे सांगून स्वत:ची पाठ थोपटत आहेत.मात्र ,मुरपार/लेंडेझरी येथील पाणीपुरवठा योजना ग्रामवासीयांसाठी पांढरा हत्ती ठरलेला असून आजही येथील ग्रामवासी शुध्द पाण्यापासून वंचित आहेत.