जिल्ह्यातील धरणात मुबलक पाणीसाठा,पाणीटंचाईवर होणार मात

0
38

खेमेंद्र कटरे/ गोंदिया- जिल्ह्यात यावर्षी जोरदार पावसाची हजेरी राहिल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणामध्ये मुबलक पाणीसाठी उपलब्ध आहे.त्यामुळे येत्या उन्हाळ्यात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उदभवण्याची सध्यातरी शक्यता दिसून येत नाही.त्यातच गेल्या तीनवर्षापासून ओव्हरफ्लो न झालेला इटियाडोह धरणही यावर्षी ओव्हरफ्लो झाल्याने हे धरण सुुद्दा भरले आहे. विशेष म्हणजे धापेवाडा उपसा सिंचन योजना वैनगंगा नदीवर तयार करण्यात आली असून या योजनेतून 70 दलघमी पाणी हे अदानी विज प्रकल्पासाठी शासन धोरणानुसार आरक्षित करण्यात आले आहे.ते पाणी वगळून पिण्याच्या पाण्यासाठी 44.05 दलघमी प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा आहे.त्यापैकी 20.083 दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी उपयुक्त असून 45.59 टक्केवारी आहे.यातील तुमसर नगरपरिषदेकरीता 2.68 दलघमी पाणी घरगुती वापरासाठी आरक्षित करण्यात आले आहे.या उपसा सिंचन योजनेतून तिरोडा येथील अदानी समुहाच्या वीज प्रकल्पाकरीता पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने सुध्दा यंदा चांगली हजेरी लावली.त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात भरपूर पाणी साठा आहे.त्यामुळे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे.परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील लघु मध्यम व मोठे सिंचन प्रकल्पातील सिंचन साठ्यात 100 टक्के पाणीसाठा उपबल्ध असून मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांना निश्चितच फायदा होणार आहे.सोबतच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवरही मात होणार आहे.
जिल्ह्यात सिंचन सुविधेच्या दृष्टीने ९ मध्यम प्रकल्प,२२ लघु प्रकल्प तर ४ मोठे धरण यांच्यासह गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत येणारे ३८ जुने मालगुजारी तलाव अस्तित्वात आहेत.या मध्ये बोदलकसा,रेगेपार, संग्रामपूर,चोरखमारा,चुलबंद,खैरबंधा,रेंगेपार,मानागड,संग्रामपूर,कटंगी व कलपाथरी असे एकूण ९ मध्यम प्रकल्प तर आक्टीटोला,भदभद्या,डोंगरगाव,गुमडोह,हरी,कालीमाटी,मोगरा,नवेगावबांध,पिपरिया, पांगडी, रेहाडी,राजोली, रिसाला,सोनेगाव, सालेकसा,सडेपार, सेरपार,वडेगाव,जुनेवानी,उमरझरी,ओवारा,बेवारटोला अशी २२ लघु प्रकल्प आहेत.
यंदाच्या खरीप हंगाम सरासरीच्या  तुलनेत समाधानकारक पाऊस पडला त्यामुळे धरण, मध्यम व लघु प्रकल्पात २१ नोव्हेंबरपर्यंतचा विचार करता जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात 94.60 टक्के साठा उपलब्ध आहे. 20 लघु प्रकल्पात 95.31 टक्के जलसाठा उपलब्ध असून 38 जुन्या मालगुजारी तलावात यंदा 92.80 टक्के साठा उपलब्ध आहे.

धरणातील जलसाठा –इटियाडोह धरणात 98.26 टक्के,सिरपूर धरणात 98.22 टक्के, पुजारीटोला धरणात 97.79 टक्के,कालीसराड धरणात 96.87 टक्के,                                                                                मध्यम प्रकल्प- कलपाथरी प्रकल्प 100 टक्के,कंटगी प्रकल्प 100 टक्के,ओवारा प्रकल्प 100 टक्के,बेवारटोला प्रकल्प 100 टक्के

पाणीपुरवठा योजनेकरीता पाणी आरक्षित- वैनगंगा नदीतील पाणी गोंदिया नगरपरिषदेकरीता 6.600 दलघमी,तर तिरोडा नगरपरिषदेकरीता0.780 दलघमी सोबतच गोंदिया एमआयडीसीकरीता 0.20 पिण्याच्या पाण्यासाठी व 0.360 दलघमी औद्योगिक वसाहतीसाठी राखीव करण्यात आले आहे.सिरपूर धरणातील 2.93 दलघमी पाणी देवरी एमआयडीसीकरीता राखीव करण्यात आले आहे.इटियाडोह धरणातील 3.072 दलघमी पाणी हे पिण्यासाठी आरक्षित आहे.या धरणातून भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पाणी पुरवठा योजनेला पाणी दिले जाते.