
सडक अर्जुनी-तालुक्यातील डोंगरगाव/सडक परिसरात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. एवढेच नव्हेतर गावातील अनेक कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे सायंकाळनंतर रात्रीच्या अंधारात गावात येवून बिबट विसावा घेत असतो. असेही २६ नोव्हेंबर रोजी निदर्शनास आले आहे. यामुळे डोंगरगाव/सडक सह परिसरातील गावांमध्ये चांगलीच दहशत पसरली होती. त्यातच वन विभागाने त्या बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. शेवटी २८ नोव्हेबंर रोजी त्या बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले.
वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणार्या सहवनक्षेत्र कार्यालय डोंगरगाव डेपो येथील परिसरात गेल्या आठ दिवसापासून बिबट्याच्या धुमाकूळ मुळे दहशतीचे वातावरण पसरले होते. तीन दिवसापासून परिसरातील शेतकर्यांच्या कोंबड्या तर काहींच्या बकर्या खाण्याचा सपाटा, त्या बिबट्याने लावला होता. त्या अनुषंगाने वन कर्मचार्यांनी कंबर कसून डोंगरगाव डेपो परिसरात दोन पिंजरे लावण्यात आले.
अखेर तो बिबट्या २७ नोव्हेंबरच्या रात्री ३.00 वाजता पिंजर्यात अडकला. त्याला पकडण्यात वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांना यश आले आहे.
त्या जेरबंद बिबट्याला गोरेगाव जंगल परिसरात सोडण्यात आले. सडक अर्जुनी तालुक्यात बिबट्याची धुमाकूळ आता नित्याची बाब झाली आहे. तालुक्याला लागून असलेल्या नवेगाव नागझिरा अभयारण्यातील प्राणी हे गाव परिसराकडे येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.