
जागतिक मृदा दिन व कृषी प्रदर्शनाचे आयोजन
गोंदिया दि. 06: कृषी आणि बागायती पिकांमध्ये माती आणि माती नमुना विश्लेषणाची आवश्यकता असून जमिनीची उत्पादकता आणि आरोग्य सुधारण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकरी आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, हिवरा गोंदिया येथे 05 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. डॉ. नितीन पाटील प्रमुख शास्त्रज्ञ आणि प्रमुख, राष्ट्रीय मृद सर्वेक्षण आणि भुमी नियोजन संस्था, नागपूर, डॉ. सय्यद शाकीर अली वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र गोंदिया, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा उपव्यवस्थापक अविनाश लाड नाबार्ड, श्रीराम पाचखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी, संजय संगेकर जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, धनराज तुमडाम, तालुका कृषि अधिकारी, संजय अहिरवार, महाराष्ट्र राज्य हेड, टाफे, यांच्या उपस्थितीत कार्यक्रमासह कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. पवन मेश्राम, तांत्रिक अधिकारी कृषि विभाग चे मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यावेळी उपस्थित होते.
डॉ. सय्यद शाकीर अली वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी जागतिक मृदा दिन कार्यक्रमाबाबत माहिती दिली व शेतकऱ्यांना माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर व चांगल्या उत्पादनासाठी मातीतील पोषक तत्वांचे महत्त्व याविषयी मौल्यवान सूचना केल्या व माती परीक्षणचे महत्व विषद केले. डॉ. नितीन पाटील यांनी शेतकऱ्यांना मातीच्या आरोग्याचे महत्त्व तसेच मृदा स्त्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाची गरज समजावून सांगितली. जमिनीची योग्य मशागत मातीमध्ये सेंद्रिय कार्बन, मातीची रचना वाढवते, भौतिक स्थिरता आणि मातीची सुपीकता सुधारते असे त्यांनी सुचवले. विभाग काही प्रकल्प प्रस्तावित करेल जेणेकरून राष्ट्रीय संस्था आणि जिल्हा प्रशासन एकत्र काम करू शकतील. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र गोंदिया ने रब्बी 2022-23 अंतर्गत पीक विविधीकरण कार्यक्रमासाठी केलेल्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. विविध कृषी आणि बागायती पिकांमध्ये माती आणि माती नमुना विश्लेषणाची आवश्यकता आणि महत्त्व स्पष्ट केल. त्यांनी जमिनीची उत्पादकता आणि आरोग्य सुधारण्यासाठी अनेक बाबींवर प्रकाश टाकला आणि मृदा आरोग्याचे महत्त्व सांगून मृदा आरोग्य व्यवस्थापनाची कल्पना दिली. या व्यतिरिक्त त्यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले, पीक वैविध्य आणि मृदा जैवविविधतेची कल्पना या कार्यक्रमादरम्यान मांडली.
अविनाश लाड यांनी सर्व शेतकरी उतपादक कंपनी आणि सर्वसहाय गटातील सदस्यांनी आणि शेतकऱ्यांनी माती परीक्षणासाठी करावे आणि तांत्रिक माहिती मिळविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राचा लाभ घ्यावा असे सुचवले. तसेच नाबार्डने शेतकरी समाजाच्या हितासाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. हिंदुराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी कमी खर्चाचे तंत्र यावर मार्गदर्शन केले. श्रीराम पाचखेडे यांनी मोबाईल सॉईल टेस्टिंग व्हॅनची माहिती दिली व शेतकऱ्यांनी माती परीक्षणासाठी त्याचा लाभ घेण्याच्या सूचना केल्या. माविमचे जिल्हा समन्वयक संजय सांगेकर यांनी विविध बचत गटांच्या आणि शेतातील महिलांच्या यशोगाथा, माती परीक्षण, लाल तांदूळ, मशरूम, दुग्धव्यवसाय, दूध संकलन, लाख उत्पादन आणि त्यातील उत्पादने यांची ओळख करून दिली.
शेतकऱ्यांना पीएमएफएमई योजना, पीक विविधीकरण आणि माती परीक्षण अहवाल व मृदा आरोग्य कार्ड वाटप याविषयी माहिती दिली व सर्व शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे डी. एल. तुमडाम यांनी सांगितले. एम. व्ही. भोमटे यांनी काळ्या उडीत पिकाची लागवड, खत व्यवस्थापन, पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. कार्यक्रम दरम्यान विविध नाविन्यपूर्ण शेतकरी, सवयं सहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांनी त्यांची उत्पादने जसे गांडूळ खत, हळद पावडर, तांदूळ, विविध बेकरी उत्पादने, लाख उत्पादने, भाजीपाला, गूळ, मशरूम इत्यादींचे प्रदर्शन तसेच कृषी यांत्रिकी करणासाठी आवश्यक अवजारे यांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा संपूर्ण उपक्रम गणेश खेडीकर कार्यक्रम सहाय्यक (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) यांनी केला व सुत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार आर. डी. चव्हाण यांनी मानले.