
गोंदिया– जिल्ह्यातील मुंडीकोटा या छोट्याशा खेडेगावातून अमेरिकेत ज्येष्ठ वैज्ञानिक असलेले डॉ. तारेंद्र लाखनकर यांच्या जीवनप्रवासातील अनुभव असलेल्या ‘झेप. एका तार्याची’ (सातासमुद्रापार) या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता.२५) तुमसर येथील शकुंतला सभागृहात दुपारी ४ वाजता होत आहे.
डॉ. तारेंद्र लाखनकर हे सध्या अमेरिकेतील द सीटी युनिव्हर्सिटी ऑफ न्युयॉर्कमध्ये उपग्रह सेन्सिंग केंद्रात ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून संशोधन करीत आहेत. सोबतच प्राध्यापक म्हणुनही शिकवत आहेत. त्यांनी डॉक्टरेट अमेरिकेतल्या सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्युयॉर्क आणि पोस्ट डॉक्टरेट कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले. आधीचे शिक्षण एम. टेक विश्वसरैया नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर आणि पॉलिटेक्निक डिप्लोमा साकोली सेंदूरवाफा तर बीई नांदेडच्या श्री गुरुगोविंद सिंगजी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँंड टेक्नॉलॉजीमधून पूर्ण केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंडीकोटा आणि त्यानंतर तुमसर येथे झाले.
संशोधनाव्यतिरिक्त नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, अर्जंेटिना आणि अन्य देशांना सहयोग करून उपग्रह, हवामान, आणि हवामान बदलाचा लोक, शेती आणि जनावरांवर होणारा बदल या विषयावरही ते संशोधन करीत आहेत. मागील १५ वर्षांतील त्यांचे योगदान बघून २0२२ मध्ये त्यांना युनिव्हर्सिटी तर्फे गौरविण्यात आले आहे. २0२२ मध्ये इंडिया इनिशिएटिव्ह कोलॅबोरेशनची नियुक्ती करण्यात आली. भारत-युएसमध्ये हवामान शाश्वतता, पाणी, अन्नसुरक्षा आणि हवामान समजून घेऊन विद्यार्थ्यांना, करिअरच्या दृष्टीने प्रयत्नशील असलेल्या आणि व्यावसायीकांसाठी क्रॉस-डिसिप्लिनरी आणि क्रॉस सांस्कृतिक शिक्षण वातावरण प्रदान करणार आहे. या दरम्यान भारतातून अमेरिकेत आलेल्या चार विद्यापिठाचे कुलगुरु, अमेरिकन रिसर्चर आणि अधिकार्यांसोबत चर्चा करून सामायिक स्वारस्य विधानावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानंतर लगेचच भारतात अमेरिकन प्रतिनिधींसोबत येऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी समकक्ष डाक्युमेंटवर स्वाक्षरी केली. याचदरम्यान अमेरिकन डेलिगेटसोबत महाराष्ट्र, ओरिसा, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथील विविध विद्यापिठांमध्ये जाऊन हवामान बदल या विषयावर परिषद घेऊन मार्गदर्शन केले आहे.
ते अमेरिकेत असले तरी मातृभूमीला विसरले नाहीत. तुमसरच्या ज्या शाळेत ते शिकले त्या राष्ट्रीय विद्यालयाला आजही ते भेट देतात. देणगी, वाचनालयासाठी पुस्तक, वर्गावर्गात पंखे, मुलांना खेळण्यासाठी व्हॉलीबॉल कोर्ट तयार करून दिले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मेळावे, आपल्या शिक्षणाचा त्यांना फायदा व्हावा, या हेतुने भारतात आले की मुंबई, अमरावती, नागपूर, वर्धा व बर्याच ठिकाणी शाळा, कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
मुंडिकोटा ते अमेरिका इथपर्यंतच्या प्रवासात आलेले बरे-वाईट प्रसंग, त्यांना सहकार्य करणारे आई-वडील, कुटुंब आणि मित्र या सर्वांचे अनुभव या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.