संत कबीर आश्रम पर्यंत काँक्रिट रस्त्याची मागणी

0
24

मोहाडी -तालुक्यातील निलज बु येथील संत कबीर विज्ञान आश्रम हे स्थानिकांचे व बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या कबिरांच्या अध्यात्मिक अनुयायांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. संत कबीरांचे जाती, पंथ, धर्म भेद नष्ट करण्यासाठी समाजात मोलाचे योगदान आहे. याच संत परंपरेतील अनेक महात्म्यांनी निलज बु हे गाव पावन झाले आहे. अनेक वर्षांपूर्वी वैनगंगेच्या नदीकाठावर एकांत स्थानी अनेक साधुनी आपल्या प्रवाचनांच्या माध्यमातून समाजाला एकतेची व बंधू भावाची शिकवण दिली. अशा संतांच्या पवित्र भूमीत जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील व परराज्यातून अनेक भाविक भक्त इथे आत्मिक सुखाच्या शोधात येत असतात; परंतु स्थानिक प्रशासन इथे सोयी-सुविधा पुरवताना दिसत नाही. संत कबीर आश्रमापर्यंत जाणारा रस्ता हा अखेरच्या घटका मोजत आहे. या आश्रमात वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन पुढील महिन्यात करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने शेकडो अनुयायांची येथे उपस्थिती राहणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी इथे शेकडो अनुयायी उपस्थित राहणार आहेत.

पावसाळ्यात आश्रम पर्यंत जाण्याकरिता अनेक भक्तांना कठीण रस्ता पार करावा लागतो. दुचाकी अथवा साधी सायकलही या रस्त्याने जाणे कठीण असते. पायी जातानाही गुडघाभरापर्यंत चिखलाचा सामना करावा लागतो. या आश्रमापर्यंत जाण्याकरिता पक्क्या रस्त्याची मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात येत आहे. या रस्त्याचे पक्के बांधकाम झाल्यास संत कबीर आश्रमात जाणाऱ्या अनुयायांसोबतच परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही याचा फायदा होईल. त्यासोबतच वैनगंगा नदीपात्रात येणाऱ्या अनेक परिसरातील पर्यटकांची संख्या वाढीस लागण्यास मदत होईल. यामुळे गावातील अप्रत्यक्षरीत्याने अर्थव्यवस्था वाढीस लागेल. गावातील लोकांना काही प्रमाणात का असेना बाहेरगावातून आलेल्या अनुयायांमुळे अप्रत्यक्षरीत्या रोजगाराचे साधन प्राप्त होईल. ग्रामपंचायतीने व जनप्रतिनिधींनी प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

जिल्ह्याबाहेरील अनुयायांना व स्थानिकांना होते अडचण

गावाच्या पश्चिमेला असलेला रस्त्याच्या पक्क्या बांधकामाच्या मागणीसाठी नागरिक एकवटले आहेत. तेजराम आंजनकर (महावितरण ट्रान्सफॉर्मर) ते संत कबीर विज्ञान आश्रम, निलज बु. पर्यंतचा रस्त्या आपल्या अखेरच्या घटका मोजत आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते.