गडचिरोली-शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची, स्पर्धा परिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी या उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या संकल्पनेअंतर्गत एक गाव; एक वाचनालय उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाची कोटगूल, पेरमिली, बामणी, रेगडी येथे सुरुवात करण्यात आली आहे. याचअंतर्गत कोटगूल परिसरातील नागरिक व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणी व र्शमतदानातून कोटगूल येथील जुन्या अंगणवाडीची दुरुस्ती करुन आधुनिक सार्वजनीक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली.
कोटगूल येथील एक गाव, एक वाचनालयाचे लोकार्पण करण्यापूर्वी प्रमुख पाहण्यांचे आगमन होताच ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात पानफुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये भारताचे संविधान ठेवण्यात आले होते. सदर दिंडीत शालेय विद्यार्थी व परिसरातील नागरिक बहूसंख्येने सहभागी झाले. त्यानंतर पोलिस अधिक्षकांसह इतर प्रमुख पाहूण्यांच्या उपस्थितीत उद््घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, ज्ञानज्योती पुणेचे संस्थापक डॉ. विशाल भेदूरकर, सतीश उमरे, कोरची पंस माजी सभापती र्शावण मातलाम, कोटगूल सरपंच मंजूषा कुमरे, सोनपूर सरपंच गुलशन नैताम, वैद्यकीय अधिकारी हरिश टेकाम, नसरुद्दीन भामानी, राजेश् नैताम, झुल्फीकार खेतानी आदींसह परिसरातील सर्व पोलिस पाटील, प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमादरत्यान मान्यवरांनी आपल्या संबोधनातून विद्यार्थी, नागरिकांना शिक्षण व वाचनालयाचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी पुणे येथील विशाल भेदूरकर यांनी जीवनातील खडतर अनुभव सांगून कोटगूल क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना फ्री ऑनलाईन क्लासेस व उत्कृष्ट दोन विद्यार्थ्यांची निवड करुन पुणे येथील अकादमीत निवासी स्पर्धा परीक्षेची मोफत तयारी करुन देण्याचे आश्वासन दिले. यावेळी वाचनालयाचे ओळखपत्र काही युवक-युवतींना प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी आयोजित मेळाव्यात दिव्यांग नागरिकांना बस सवलत, युडीआईडी कार्ड व शेतकर्यांना बी-बियाणे वाटप करण्यात आले.