भजेपार येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
सालेकसा: आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घालता आली पाहिजे. केवळ नोकरीचे स्वप्न बघून चालणार नाही तर, ती प्राप्त करण्यासाठी जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. वाम मार्गाला न लागता विद्यार्थ्यांनी स्वप्नांचा पाठलाग करावा, यश आपलेच आहे. असे प्रतिपादन सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्धन हेगडकर यांनी केले.
सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे श्रमदान आणि लोकवर्गणीतून साकारलेल्या अध्ययन कक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन शिबिराला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भवभूती महाविद्यालय आमगाव चे प्राचार्य डॉ.पी.के. रहांगडाले, प्रमुख मार्गदर्शक पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता शिखा पिपलेवार, सरपंच चंद्रकुमार बहेकार, पंचशील जुनियर कॉलेज मक्काटोलाचे प्राचार्य एस.पी नंदेश्वर, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भजेपारच्या मुख्याध्यापिका एम एम देवरे, डॉ. रामेश्वर बहेकार, ग्राम सेवक रितेश शहारे सह अन्य मान्यवर उपस्थित होते. युवा दिन व जिजाऊ जयंती निमित्त स्वामी विवेकानंद अध्ययन कक्षाच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.तत्पूर्वी परिसरातील विद्यार्थ्यांची दोन गटात स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यात तब्बल 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन त्यांचा गुण गौरव करण्यात आला. अध्ययन कक्षात अध्ययन करून शासकीय नोकरी प्राप्त करणारे यशवंत विद्यार्थी स्नेहल तुरकणे, संदीप बारसे आणि लुकेश बहेकार आणि त्यांच्या पालकांचा देखील यावेळी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्थापने पासून आतापर्यंत तब्बल 30 विद्यार्थी यशस्वी झाले. त्यांच्या नावाचे फलक देखील अध्ययन कक्षात लावण्यात आले. जेणेकरून ईतर विद्यार्थी त्यांची प्रेरणा घेऊन जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करतील. कार्यक्रम प्रसंगी नवनिर्वाचित ग्राम पंचायत उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, सदस्य ममता शिवणकर, आत्माराम मेंढे, आशा शेंडे, रेवतचंद बहेकार, रविशंकर बहेकार,राजेश बहेकार, मनीषा चुटे आणि सरस्वता भलावी यांचा स्वागत सत्कार दरम्यान एका छोट्याशा खेडेगावात अध्ययन कक्षाची संकल्पना यशस्वीरित्या साकार केल्याबद्दल अतिथिंनी ग्राम वासीयांचे कौतुक केले. संचालन नंदकिशोर कठाने, प्रस्तावना दिलीप पाथोडे आणि आभार प्रदर्शन लोकेश चुटे यांनी केले. यशस्वितेसाठी हेमंत चुटे, डॉ. विवेक बहेकार, मुकेश पाथोडे सहित स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष, गुरुदेव सेवा मंडळ, तंटा मुक्त समिती, ग्राम पंचायत व संपूर्ण भजेपार ग्राम वासीयानी अथक परिश्रम घेतले.
स्पर्धा परीक्षेला उदंड प्रतिसाद
प्राथमिक ते 12 वी पर्यंत एक गट आणि खुला एक अशा दोन गटात स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यात जिल्ह्यातील 400 विद्यार्थी सहभागी झाले होते. यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांचा रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.