Home विदर्भ गोंदिया जिल्ह्याचे गॅझेटीअर प्रथमच तयार होणार

गोंदिया जिल्ह्याचे गॅझेटीअर प्रथमच तयार होणार

0

कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ.दिलीप बलसेकर
जिल्हा गॅझेटिअर निर्मितीबाबत बैठक

     गोंदिया, दि.23 : पुढील वर्षी १ मे २०२४ रोजी गोंदिया जिल्हा निर्मितीला २५ वर्ष पूर्ण होत असून जिल्हा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जिल्ह्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका (गॅझेटीअर) विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याचे गॅझेट प्रसिद्ध करण्यात येणार असून गॅझेटीअरचे काम वेळेत पुर्ण करण्यासाठी आपल्या विभागाशी संबंधीत माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन दर्शनिका (गॅझेटीअर) विभाग, महाराष्ट्र शासनाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि.प्र.बलसेकर यांनी सर्व शासकीय विभागांना केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत ते बोलत होते. विशेष म्हणजे जिल्ह्याचे गॅझेटीअर प्रथमच तयार होणार आहे.

         जिल्हाधिकारी कार्यालय येथे गोंदिया जिल्हा गॅझेटिअर निर्मितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, सांस्कृतिक ओळख सांगणारे परिपूर्ण असे गॅझेटीअर तयार करण्यात येणार आहे. हे गॅझेटीअर पुढील सहा महिन्यात तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

        गॅझेटिअर बाबत माहिती देतांना बलसेकर यांनी सांगितले की, राज्य शासनाला सर्व जिल्ह्यांचे गॅझेटिअर बनवून द्यायचे आहे. त्यामुळे आपण तळमळीने लवकरात लवकर आपल्या विभागाशी संबंधीत माहिती दिली तर गॅझेटीअरचे काम वेळेत पुर्ण होऊ शकेल. गॅझेटिअर हे ब्रिटीशकाळापासून वापरात असून ब्रिटीश लेखक जेव्हा येथे आले ते येथील भौगोलिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीशी अवगत नव्हते. त्यावेळेस त्यांना गॅझेटिअरची खूप मदत झाली. आजही आपण एखादी माहिती शोधण्याकरीता जुने गॅझेट उपयोगात आणतो. हायकोर्टानेही काही निर्णय देतांना गॅझेटिअरची मदत घेतली आहे. यातच गॅझेटीअर चे महत्व विशद होते. गॅझेटिअर हे भविष्यासाठी उत्तम असून आपल्याला पाहिजे असलेली जुनी माहिती येथील संस्कृती, भौगोलिक रचना माहित होते. त्यामुळे माहिती गोळा करतांना भूमिपुत्रांना समाविष्ट करुन घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटन स्थळे, ब्रिटीशकाळीन वास्तुशिल्पाचे छायाचित्र गॅझेटिअरसाठी लागणार असल्यामुळे ते गोळा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा निर्मितीनंतर झालेले प्रशासकीय बदल, जिल्ह्याचा इतिहास, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या योजना, उपक्रम, रस्ते, पाटबंधारे, कृषी, उद्योग, शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक व अन्य योजना, लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविलेल्या विविध योजना, त्यांचे लक्ष व साध्य, व्यापारवृद्धी, बँकिंग सेवा, धर्मदाय संस्था, स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर जिल्ह्याच्या संस्कृतीत झालेले कालानुरूप बदल, जिल्ह्यातील पर्यटन-प्रेक्षणीय स्थळे, नाट्य संस्कृती,  जलसिंचन प्रकल्प, बचत गट, सामाजिक संस्था, गोंडी संस्कृती व कला, दंडार कला, वृत्तपत्र आणि पत्रकारिता, व्यावसायिक रंगभूमी यासह विविध विषय, विकासाचे टप्पे व बदल याची नोंद घेणारी माहिती उत्कृष्ट छायाचित्रांसह एक महिन्याच्या आत सादर करावी असे आवाहन त्यांनी केले.

           जिल्हा गॅझेटीअरमध्ये दहा प्रकरणांचा समावेश असणार :  या गॅझेटिअरमध्ये वेगवेगळ्या विषयानुसार १० प्रकरणांचा समावेश असेल. यामध्ये जिल्ह्याचा भूगोल, जिल्ह्याचा इतिहास, येथील लोकसंस्कृती, कृषी व जलसिंचन, उद्योगधंदे, बँक व्यापार व वाणिज्य, वाहतूक व दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती व प्रेक्षणीय स्थळे या प्रकरणांचा समावेश आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग काम करणार आहेत तसेच विदर्भातील इतिहासाचा अभ्यास करणारे विद्यापीठातील प्राध्यापक यांची निवड या जिल्हा गॅझेटिअर निर्मितीसाठी केली जाणार आहे. यावेळी विविध विभागाचे प्रमुख व सालेकसा येथील एम.बी. पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. नामदेव हटवार उपस्थित होते.

Exit mobile version