हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण

0
15

जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम संपन्न

गोंदिया, दि.2 – : दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढवण्याकरिता ‘‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’’च्या माध्यमातून शहरी भागातील सामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिक व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा राज्य शासनाचा मानस असून गोंदिया जिल्ह्यातील नागरी भागात प्रत्येक तालुक्यात एक अशा एकुण 8 हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 1 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकांना समर्पित केला. गोंदिया तालुक्यातील शहरी भागातील गजबजलेल्या व दाट वस्तीतील छोटा गोंदिया परिसरात जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

         सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राज्यात “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” (नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र) चा डिजिटल अनावरण सोहळा 1 मे रोजी मुंबई येथे संपन्न झाला. हा डिजिटल अनावरण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

         गोंदिया तालुक्यातील शहरी भागातील गजबजलेल्या व दाट वस्तीतील छोटा गोंदिया परिसरात जिल्ह्यात “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना”चा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा 1 मे रोजी सकाळी संपन्न झाला. उद्घाटन सोहळा प्रसंगी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, गोंदिया पंचायत समिती सभापती मुनेश्वर रहांगडाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, माजी नगरसेविका भावना कदम, कुंदा पंचबुद्धे व छोटु पंचबुद्धे, मुकेश मिश्रा, कुंभारेनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सलील पाटील, दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे फित कापुन उद्घाटन केले. मान्यवरांनी “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” छोटा गोंदिया नागरी आरोग्यकेंद्राची पाहणी केली. रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी दिली. “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना”मध्ये बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच या केंद्रामध्ये उपरोक्त सेवांच्या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे (एच.एल-एल. कंपनी मार्फत) रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषतज्ञ संदर्भ सेवा दिली जाणार आहे.

        “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” केंद्रातून रुग्णांना गरजेनुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून बाह्यरुग्ण विभागातील खालील विशेषतज्ञ संदर्भ सेवा विशेष विशेषतज्ञांमार्फत प्रदान करण्यात येतील. भिषक (फिजिशियन), स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, नाक कान घसा तज्ञ. सदर तज्ञ सेवा या सायंकाळी 5.00 ते 9.00 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येतील, जेणेकरून झोपडपट्टी भागातील व शेतातील मजूर कामावरून परत आल्यानंतर या सेवांचा लाभ घेतील.

        “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कर्मचारी, अटेंडंट/गार्ड आणि सफाई कर्मचारी आदी मनुष्यबळाचा समावेश असणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” छोटा गोंदिया येथे सुरू झालेल्या दवाखान्यात लोकांनी मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, गोंदिया पं.स. सभापती मुनेश्वर रहांगडाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी केले आहे.

          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमर वर्हाडे यांनी केले तर डिजिटल अनावरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सभा मंडपात बघण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील रविंद्र जाधव, संजय मेंढे, प्रितेश मेश्राम यांनी मोलाची व्यवस्था पार पाडली. कार्यक्रम सोहळा प्रसंगी प्रशांत खरात, गोंदिया नागरी आरोग्य केंद्र कुंभारेनगर येथील आशा सेविका, आरोग्य सेविका व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.