भंडारा-बांधकाम पूर्ण होऊनही पुलावरून रहदारी सुरू न केल्याने माजी जि. प. सदस्य सुभाष आजबले यांच्या नेतृत्वात आंभोरा पुलावर शेकडो नागरिकांनी रहदारी सुरू करण्यासाठी आंदोलन केले. काम अपूर्ण असल्याने रहदारी सुरू करता येणार नाही, ही भूमिका शासनाने घेतली तर आंदोलकांनी आम्ही पुलावरून जाणारच ही भूमिका घेतल्याने चार तासाच्या दिर्घ चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने अखेर आंदोलनकर्त्यांना अड्याळ पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
तीर्थक्षेत्र आंभोरा या भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वैनगंगा नदीवर गेल्या सहा वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरु आहे. आता बांधकाम पूर्ण झाले असूनही पुलावरून रहदारी सुरू न केल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन डोंग्याने किंवा दीडशे किलोमीटरच्या फेर्याने प्रवास करावा लागत आहे. या अनुषंगाने माजी जि. प. सदस्य सुभाष आजबले यांच्या नेतृत्वात नागरिकांनी आंभोरा पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. पुलावरून दुचाकी व पादचारीसाठी रहदारी सुरू करा, ही भूमिका घेऊन ठिय्या आंदोलनात बसले होते.
आंदोलनस्थळी उपअभियंता ताकसांडे, अभियंता कैरमकांडे, तहसीलदार राजेंद्र निंबार्ते, नायब तहसीलदार आनंद हट्टेवार यांनी भेट दिली. तहसीलदार निंबार्ते यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पुलाला जे केबल वापरले आहे ते ऑस्ट्रेलिया देशातील आहे आणि २0 मे ते ३१ मे ला केबलची टेस्टिंग आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र आंदोलनकर्त्यांनी रहदारी सुरू करण्याची मागणी रेटून धरली होती. पूल तयार करणारी कंपनीसोबत बैठक आहे व ते लवकरच आंदोलनकर्त्यांना कळविणार आहेत, असे सांगूनही आंदोलनकर्ते रहदारी सुरू करा हीच भूमिका घेऊन ठिय्या आंदोलन ठोकून बसले होते. अखेर अनुचित घटना घडू नये म्हणून अड्याळचे ठाणेदार प्रदीप मिसाळे व कर्मचार्यांनी माजी जि. प. सदस्य सुभाष अजबले, प्रवीण उदापुरे, विनायक रामटेके, राजेश मेर्शाम, प्रमिला शहारे,काजल चवरे, पूजा ठवकर, स्वप्नील आरीकर, भाऊगोविंद काटेखाये, जयदेव लोणारे, जयदेव देवगडे आदींना ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
यावेळी अड्याळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप मिसाळे व कर्मचारी सुभाष राहांगडाले, संदीप नवरखेडे, संघर्ष बोरकर, जितेंद्र वैद्य, व आर. सी. पी. पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.