जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नियोजनबध्द कृती आराखडा तयार करा – जिल्हाधिकारी

0
21

गोंदिया,दि.4 : जलयुक्त शिवार अभियान ही राज्याची महत्वाकांक्षी योजना आहे. या अभियानांतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या कामाला गती मिळावी यासाठी दुसऱ्या टप्प्याअंतर्गत पात्र गावांची निवड करुन नियोजनबध्द कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिल्या.

         जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जलयुक्त शिवार अभियान 2.0, जलशक्ती अभियान (Catch the rain), गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 आदी योजना राबविणाऱ्या यंत्रणांची संयुक्त बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

        सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा मृद व जलसंधारण विभागाचे सदस्य सचिव अनंत जगताप, उपजिल्हाधिकारी (रोहयो) लिना फलके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, जि.प.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत, भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सचिन खोडे, जि.प.गटविकास अधिकारी (नरेगा) डी.एस.लोहबरे, वन विभागाचे प्रतिनिधी, भारतीय जैन संघटनेचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष हिरेन जैन, विभागीय समन्वयक नितीन राजवैद्य उपस्थित होते.

        जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत पात्र गावांची निवड करुन जिल्ह्याचा कृती आराखडा तयार करावा. शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त कामांना कृषि, जलसंपदा, वन, मनरेगा यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणांनी सुरुवात करावी. एकात्मिक पध्दतीने ग्रामस्थ, शेतकरी तसेच सर्व संबंधीत विभागाच्या समन्वयाने नियोजनबध्द अंमलबजावणी करुन जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत विविध मृद व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार, जुन्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे घेऊन त्यांची यशस्वी अंमलबजावणी करुन शेतीसाठी संरक्षीत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यात यावी. शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील 100 गावात जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे असे त्यांनी सांगितले.

        अमृत सरोवर अंतर्गत जिल्ह्यातील 30 कामे प्रगतीपथावर असून प्रलंबीत कामे येत्या 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे. गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत जास्तीत जास्त गाळ काढण्याचे नियोजन करुन पाणी साठा वाढविण्याची अंमलबजावणी युध्दस्तरावर करावी. जलशक्ती अभियानांतर्गत (Catch the rain) पावसाच्या पाण्याची साठवणूक करुन ठेवावी. मनरेगाची प्रलंबीत कामे सुरु करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

       यावेळी भारतीय जैन संघटना (गोंदिया जिल्हा) यांचेद्वारे संगणकीय सादरीकरणाद्वारे गाळमुक्त धरणाबाबत उपयुक्त अशी माहिती देण्यात आली.