Home विदर्भ तेढवा येथे कृषि विभाग व आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांच्या गरजेनुरुप शेतकरी प्रशिक्षण

तेढवा येथे कृषि विभाग व आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांच्या गरजेनुरुप शेतकरी प्रशिक्षण

0

गोंदिया दि.12 :- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषि अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम 2023-24 अंतर्गत दिनांक 12 मे 2023 रोजी माता मंदिर चावळी तेढवा येथे शेतकऱ्यांच्या गरजेनुरुप शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेढवा गावच्या सरपंच कौशल्या तुरकर होत्या. मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषि अधिकारी दासगाव राजेश पवार, कृषि पर्यवेक्षक जितेंद्र मेंढे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) गोंदिया सुनिल खडसे, कृषि सहाय्यक संगिता दाडगे उपस्थित होते.

         शेतकऱ्यांच्या गरजेनुरुप शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात जितेंद्र मेंढे यांनी बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी यावर मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करुन दाखविले. सुनिल खडसे यांनी सेंद्रीय शेती, जैविक शेती व नैसर्गिक शेती यावर मार्गदर्शन केले व बिजामृत, जिवामृत, दशपर्णी अर्क याचा वापर कसा करावा याबद्दल विस्तृत माहिती दिली. राजेश पवार यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, कृषि विभागाची यांत्रिकीकरण योजना, सामुहिक शेततळे व कृषि विभागाच्या विविध योजनेवर सविस्तर मार्गदर्शन केले. तेढवा गावच्या सरपंच कौशल्या तुरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

         कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक तेढवा संगिता दाडगे यांनी केले. कार्यक्रमाला तेढवा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version