गोंदिया, दि.17 : अलीकडील काळात प्रवासी बसेसच्या वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रवासी बसमधील वेगनियंत्रक, आपात्कालीन दरवाजा, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी व कागदपत्रांची वैधता तपासण्यात येत असून सोबत चालकाची ब्रेथ अॅनालायझरद्वारे मद्यप्राशन तपासणीदेखील करण्यात येत आहे.
सीमा तपासणी नाका शिरपूर देवरी येथे आंतरराज्य वाहतुक करणाऱ्या 232 बसेसची तपासणी करण्यात येवून 140 दोषी बसेसवर कारवाई करण्यात आली व 1 लाख 87 हजार 750 रुपये इतकी दंड वसुली करण्यात आली. तर कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत 75 बसेसची तपासणी करण्यात येवून 14 दोषी बसेसवर कारवाई करण्यात आलेली आहे व 1 लाख 32 हजार 500 रुपये इतकी दंड वसुली करण्यात आलेली आहे.
सदर तपासणी मोहिमेमध्ये कारवाई सोबत चालकांचे समुपदेशन देखील करण्यात येत असून त्यांना सुरक्षित बचावात्मक वाहतुकीचे धडे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत।देण्यात येत आहे. प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याने सदर मोहिम नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सांगितले.