गोंदिया, दि.24 : आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यातील छोट्या सालई या खेडेगावातील ॲड. आशा तेजराम भाजीपाले यांची नुकतीच एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट-अ पदी निवड झाली आहे. त्यांनी महाराष्ट्रातून मेरिट लिस्टमध्ये 46 वे स्थान मिळविले असून देवरीचे नाव लौकिक केले आहे.
आशा तेजराम भाजीपाले यांचे प्राथमिक शिक्षण व पदवी शिक्षण देवरी येथे झाले असून त्यांनी एल.एल.बी. एनएमडी कॉलेज गोंदिया येथे केले आहे. त्यांचा सदर परीक्षेचा सराव एक वर्षापासून सुरु होता व त्यांनी अथक परिश्रम करुन यश संपादन केले आहे. सदर यशाचे श्रेय त्यांनी आई-वडिल, पती प्रविण दळवी, मार्गदर्शक ॲड. प्रशांत संगीडवार, मित्र परिवार आणि कुटूंबियांना दिले आहे. आशा भाजीपाले यांचे देवरी तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यात अभिनंदन करण्यात येत आहे.