गोंदिया, दि.24 : शाळेत सर्वांनी नकारात्मक वातावरण बाजूला सारुन सकारात्मक वातावरण निर्माण करावे. मुख्याध्यापकांनी प्रत्येक दिवशी स्टाफ रुम कन्सेप्ट राबवावी. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती तसेच शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढविण्यासाठी भविष्यवेधी शिक्षण प्रणाली योग्यप्रकारे राबवा, अशा सूचना आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी दिल्या.
चालू शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये मोठया प्रमाणात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढविण्याच्या दृष्टीकोणातून तसेच शैक्षणिक गुणवता विकास करण्यासाठी शासकीय, अनुदानित, एकलव्य आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शनाव्दारे प्रेरणादायी प्रशिक्षणाच्या नियोजनांच्या अनुषंगाने देवरी येथील गोंडवाना सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दशरथ कुळमेथे, उपायुक्त, आदिवासी विकास नागपूर व विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी देवरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांचे संकल्पनेतून मागील दोन-तीन वर्षापासून नागपूर विभागातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढविण्याच्या दृष्टीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये किती प्रगती झालेली आहे याबाबत देवरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत येत असलेल्या शासकीय, अनुदानित व एकलव्य शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांसोबत बैठक आयोजित करुन आढावा घेण्यात आला.
सभेच्या सुरवातीला रविंद्र ठाकरे यांनी मागील सत्रामधे अतिदुर्गम अशा देवरी प्रकल्पातील १७ विद्यार्थ्यांनी JEE (Main) सारख्या कठीण पात्रता परिक्षेत यश संपादन करुन आदिवासी विकास विभागाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांचेसह संजय बोन्तावार, श्री. मराठे, श्री. बन्सोड यांचे अभिनंदन केले. प्रशिक्षित शिक्षक नसतांना व खाजगी संस्थेचे मार्गदर्शन न घेता यश संपादन केले आहे हे खरोखरच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. देवरी प्रकल्पाने एक आदर्श घालून दिला आहे याचे अनुकरण इतर प्रकल्पामधे सुध्दा राबविण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांना आपण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केले तर ते विद्यार्थी सुध्दा खुप यश मिळवितात हे यातून सिध्द होते असे त्यांनी सांगितले.
Lift for upliftment या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष अतुल ढाकणे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत ‘निटची’ तयारी करुन घेण्यासाठी उलगुलान बॅच निर्माण करुन अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील ६० टक्के पेक्षा कमी गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनविले आहेत. याचा आदर्श आपण सर्व शिक्षकांनी घेवून आपल्या आश्रमशाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा अशा प्रकारचे कोचिंग देऊन डॉक्टर, इंजिनिअर, वकील निर्माण करु शकतो हा आत्मविश्वास उपस्थित सर्व शिक्षकांमधे निर्माण करण्यात आला. सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिरीष सोनेवाने, विजय मेश्राम, अरुण सुर्यवंशी यांनी बैठकीचे योग्य नियोजन केले. उपस्थितांचे आभार दिपेश मांडे यांनी मानले.