. ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’मोहिमेचा पहिला टप्पा 7 ते 12 ऑगस्ट दरम्यान
. पालकांनो, लसीकरण करुन सुरक्षित ठेवा बालकास
गोंदिया, दि.10 : बालकांमधील आजार व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून तीन टप्प्यांमध्ये मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात 0 ते 1 वर्ष वयोगट 2159 बालके, 1 ते 2 वर्ष वयोगट 2895 बालके, 2 ते 5 वर्ष वयोगट 69 बालके तर 106 गरोदर माता आहेत. पालकांनो आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना, गरोदर मातांना घातक आजारापासून दूर ठेवायचं असेल तर शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या मिशन इंद्रधनुष्य मोहीम अंतर्गत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन काम करावे, जेणेकरुन कुपोषण मुक्त ग्राम संकल्पना राबिण्यास मदत होणार असल्याचेही व्यक्त केले आहे. लसीकरणामुळे पोलिओ, काविळ, क्षयरोग, डांग्या खोकला, न्युमोनिया, श्वसन, मेंदूज्वर, गोवर व रूबेला, रातांधळेपणा आदी आजारांपासून बालकांना संरक्षण मिळते. त्याचबरोबर गरोदर मातांनाही याचा मोठा फायदा होतो.
लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे. सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत प्रत्येक गावात लसीकरण सत्राचे आयोजन होत असते.
बाळ जन्माला आले की, सर्वाधिक काळजी ही त्याच्या आरोग्याची घ्यावी लागते. नवजात बाळाचे शरीर हे अतिशय कमकुवत असते. त्याला कोणत्याही प्रकारच्या रोगाचा वा आजाराचा विळखा सहज बसू शकतो. म्हणून त्यासाठी त्याला सुरक्षा कवच प्रदान करणे गरजेचे असते आणि लसीकरणामधून बाळाला विविध आजारांपासून व रोगांपासून अशी सुरक्षा कवच प्रदान केली जातात. बाळ जन्माला आल्यावर हॉस्पिटलकडून त्याच्या पालकांना ठराविक वयामध्ये त्याला कोणत्या लसी द्याव्यात त्याची तपशीलवार माहिती आरोग्य सेविका, आशा सेविका मार्फत दिली जाते आणि हे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याची जबाबदारी ही पालकांची असते.
लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. लसीत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या लसीचे शरीरात देणे म्हणजे लसीकरण होय. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात.
राज्यसह जिल्ह्यातील माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवली जात आहेत. त्याच अनुषंगाने शासनाकडून तीन टप्प्यांमध्ये 0 ते 5 वयोगटातील बालक व गरोदर मातांना मिशन इंद्रधनुष्य मोहीम अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत 394 ठिकाणी लसीकरण सत्र ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात लसिकरणापासुन वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालक व गरोदर मातांसाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिम तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.
असे आहेत तीन टप्पे :- पहिला टप्पा- 7 ते 12 ऑगस्ट, दुसरा टप्पा- 11 ते 16 सप्टेंबर, तिसरा टप्पा- 9 ते 14 ऑक्टोबर.
एका क्लिकवर मिळणार माहिती :- जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये तसेच लसीकरण अभावी बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी आता आरोग्य विभागामार्फत “युविन ॲप”चा वापर करुन बालकांची व गरोदर मातांची नोंदणी व लसीकरण केले जाणार आहे. सदर ‘ॲप’मुळे बालकांचे लसीकरण सोपी झाले असून, 0 ते 16 वयोगटातील तसेच गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या लसीकरणाची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.