अर्जुनी मोर. :- केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 76 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपिय उपक्रम अंतर्गत गट ग्रामपंचायत महालगाव येथे “माझी माती माझा देश” हा उपक्रम व पंचप्रण शपथ हा उपक्रम विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मीना शहारे, माजी सरपंच अशोक कापगते, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊराव खोब्रागडे, माजी पंचायत समिती सदस्य मारगाये, उपसरपंच नंदकिशोर गहाणे, ग्रामसेवक अरून हातझाडे, ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश नाईक, रसिका मारगाये, काजल नंदागवळी,विशाखा शहारे, उज्वला परसमोडे, महेश कुंबरे, निदेश उके, इरकन्या कुंजाम, रोजगार सेवक रमेश रामटेके, रणजीत नागोसे; राकेश लांडगे, कार्तिक राणे, हिराभाऊ गेडाम, शाळेतील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस व गावातील ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम सरपंच मीना शहारे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पंचप्रण शपथ घेऊन शहिद वीरांना नमन करण्यात आले. यावेळी शीला फलकाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. तसेच मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत गावातील माती एका कलशात भरण्यात आली. तसेच गावात विविध ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते व सरपंच मीना शहारे यांचे हस्ते महालगाव येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटनही करण्यात आले. तसेच महालगाव निलज व तावशी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. तर चारही अंगणवाडीतील बालकांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते व सरपंच मीना शहारे यांनी शासनाच्या या विविध उपक्रमाची माहिती देऊन विविध योजनांची माहिती सुद्धा दिली.