मुलीच्या जन्मावर ग्राम पंचायत देणार हजार रूपये रोख

0
18

फत्तेपूर ग्राम पंचायतीचा पुढाकार
१५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
गोंदिया : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, एकतरी मुलगा पाहिजे अशी मानसिकता समाजात रूजलेली होती. आता यात बदल होताना दिसून येत आहे. अलीकडे मलींच्या जन्माचा आनंदही दिमाखदार पद्धतीने साजरा केला जात आहे. यामुळे पुरूषप्रधान संस्कृतीचे विचार डोक्यात असलेल्या लोकांना संदेश दिला जात असून, सामाजिक बदलाला चालना मिळत आहे. गोंदिया तालुक्यातील फत्तेपूर ग्राम पंचायतीने यात पुढाकार घेत गावात मुलीच्या जन्मावर तिच्या आईला रोख १ हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकतेच ९ ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत ठराव घेण्यात आला असून १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुलगा किंवा मुलगी असा भेद करण्यापेक्षा ते आपले मूल आहे हे लक्षात घेऊन वाढवायला हवे. त्याला उच्च शिक्षण, चांगले आरोग्य व चांगले भविष्य देण्याचा नेटाने प्रयत्न प्रत्येक कुटुंबातून झाल्यास भविष्यात मुलीच्या कार्यकर्तृत्वातून त्या कुटुंबाला समाजात वेगळी ओळख मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही मानसिकता डोळ्यासमोर ठेवून फत्तेपूर ग्राम पंचायतीने पाऊल टाकले आहे. सदर योजनेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी भाजपचे सक्रिय सदस्य धनंजय रिनायत हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नरत होते. त्यांनी आपले विचार ग्राम पंचायत प्रशासनाशी पाठपुरावा करून मांडले. यावर ग्राम पंचायत सरपंच, सदस्यांनीही सहमती दर्शविली. दरम्यान ९ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेत सदर विषयी ठेवण्यात आला. यात सरपंच सौ.बघेले, ग्राम पंचायत सदस्य सुनिता राऊत, समिता उके, स्वाती पारधी, वैâलाश कोहळे, खुशेंद्र खोब्रागडे, सचिव नगरमोजे, प्रशांत रिनायत, देवेंद्र मेश्राम, सुशिल डोंगरे, संदिप वाघाडे आदिंच्या उपस्थितीत ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यामुळे फत्तेपूर येथे आता मुलीच्या जन्मावर ग्राम पंचायतीकडून तिच्या आईला १ हजार रूपये रोख दिले जाणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनापासून करण्यात येणार आहे. या निर्णयाचे गावात स्वागत करण्यात आले असून गावकर्‍यांतर्पेâ ग्राम पंचायतीचे कौतुक केले जात आहे.