
गोंदिया, दि.17 : 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघ अंतर्गत 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे छायाचित्रासह संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून सदर कार्यक्रमांतर्गत 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023 या कालवधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष घरोघरी जावून मतदारांची पडताळणी करणे, नव मतदारांचे नमुना-6 चे अर्ज स्विकारणे, ज्या मतदारांचे कायम स्वरुपी स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंद असेल अशा मतदारांचे नाव वगळणी करण्याकामी नमुना-7 भरणे, ज्या मतदारांच्या नावात किंवा इतर मजकुरात त्रुटी आहेत अशा मतदारांच्या नावात किंवा इतर मजकुरात दुरुस्ती करण्याकरीता नमुना-8 स्विकारणे तसेच तद्अनुषंगीक कामे करण्याबाबतची कार्यवाही सुरु असून एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी 17 आक्टोंबर 2023 ला प्रसिध्द करण्यात येणार आहे.
तसेच 17 ऑक्टोंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून 26 डिसेंबर 2023 पर्यंत प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. वरील कार्यक्रमांतर्गत 5 जानेवारी 2024 ला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2024 रोजी ज्या व्यक्तींचे 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा व्यक्तींनी त्यांचे मतदान केंद्रात कार्यरत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे किंवा तहसिल कार्यालय गोंदिया येथील निवडणूक शाखेत नमुना-6 चे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावे.
तसेच जे मतदार मृत/ कायम स्वरुपी स्थलांतरीत झालेले आहेत अशा मतदारांचे मतदार यादीतून नाव वगळणी करण्याकरीता त्यांचे नमुना-7, ज्या मतदारांच्या नावात, छायाचित्र व इतर तपशिलात दुरुस्ती करावयाची आहे, ज्या मतदारांना 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघ अंतर्गत त्यांचे नाव एका मतदान केंद्रातून दुसऱ्या मतदान केंद्रात स्थलांतरीत करावयाचे आहे किंवा राज्यातील (महाराष्ट्र) एका विधानसभा मतदार संघातून दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात आपले नाव स्थलांतरीत करावयाचे आहे अशा मतदारांनी नमुना-8 चे अर्ज 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे किंवा तहसिल कार्यालय गोंदिया येथील निवडणूक शाखेत सादर करावे. असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.