
भंडारा –नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून रुग्णांची सेवा करू पाहणाऱ्या विद्यार्थिनींचे स्वप्न शहरातील अरोमिरा नर्सिंग कॉलेजमुळे भंग झाले आहे. या महाविद्यालयाने विद्यार्थिनींनीचीच नव्हे तर इंडियन नर्सिंग काऊन्सिलचीही फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. या महाविद्यालयाच्या विरोधात आता विद्यार्थिनींनी बंड पुकारले असून फसवणुकीसह मानसिक छळाची तक्रार पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्याकडे विद्यार्थिनींसह एआयएसएफचे राज्य सचिव वैभव चोपकर यांनी केली आहे.भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर वार्ड स्थित अरोमीरा स्कूल ऑफ नर्सिंग तथा अरोमिरा नर्सिंग कॉलेज येथे एएनएमचे शिक्षण घेत असलेल्या १८ विद्यार्थिनींचे रजिस्ट्रेशन न करताच प्रवेश शुल्क घेऊन महाविद्यालयात प्रवेश देवून विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या विद्यार्थीनींनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा आणि सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला.इंडीयन काउन्सिलच्या कोणत्याच निकषांची व मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता या महाविद्यालयाने केली नसून सदर महाविद्यालयावर कायदेशीर कारवाई करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करावी तसेच सर्व विद्यार्थिनींना शासकीय महाविद्यालयामध्ये सामावून घ्यावे अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थिनिंसह ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.