साकोली,-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशानुसार भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन 30 ऑगस्ट पर्यंत करण्यात आले असून सुरुवात 19 ऑगस्ट रोजी साकोली येथून करण्यात आली. या महोत्सवांतर्गत साकोली येथे पारंपारिक गोंडी नृत्य, युवा व महिलांच्या सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत लोकसभा मतदारसंघातील युवक आणि महिलांच्या सुप्त गुणांना वाव देत एक चांगले व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित या महोत्सवाला वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सव असे नाव देण्यात आले आहे. तालुका आणि लोकसभा स्तरावर अशा वेगवेगळ्या वर्गवारीत हे कार्यक्रम घेतले जाणार असून तालुकास्तरातील विजेत्या स्पर्धकांना लोकसभा स्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. लोकसभा स्तरावर विजेत्या स्पर्धांना 51 हजाराचे प्रथम, द्वितीय 31 हजाराचे आणि तृतीय बक्षीस 15000 चे दिले जाणार आहे. युवक, युवती आणि महिलांना भंडारा गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच कलागुणांचे दर्शन घडविण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जात आहे.
या महोत्सवातील तालुकास्तरीय कार्यक्रमांना 19 ऑगस्ट पासून सुरुवात झाली. साकोली येथील मंगलमूर्ती सभागृहात 19 रोजी खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पारंपारिक गोंडी नृत्य स्पर्धेचे उद्घाटन केले गेले. यावेळी माजी आमदार बाळा काशीवार, लखन बर्वे, मनीष कापगते, नरेंद्र वाडीभस्मे, किशोर पोगडे, रवी परशुरामकर, अमोल हलमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा महोत्सव ग्रामीण भागातील कलावंतांना स्वतःच्या सुप्त गुणांना वाट मोकळी करून देण्याचे उपयुक्त असे व्यासपीठ असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी सांगितले.
20 ऑगस्ट रोजी साकोली आणि लाखनी तालुक्यातील युवा व महिलांसाठीच्या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन शुभांगी मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रचना गहाणे, इंद्रायणी कापगते, रेखा भाजीपाले, माहेश्वरी नेवारे, वनिता डोये, धनवंता राऊत यांच्यासह अनेक मान्यवर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. लोकनृत्य आणि देशभक्तीपर गीतावर आधारित समूह नृत्य असे या स्पर्धेचे स्वरूप आहे. साकोली लाखनी तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण 13 समूह सहभागी झाले होते. नम्रता विद्यालय उमरी च्या संघाने प्रथम, कृष्ण मुरारी कटकवार विद्यालयाचा संघ द्वितीय आणि केके डान्स ग्रुप तृतीय ठरला आहे. विजेत्यांना अनुक्रमे 15, 7 आणि 5 हजाराचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारही देण्यात आले.