व सक्रीय क्षयरोग शोध मोहिम यशस्वी करा- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
गोंदिया, दि.26 : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि.२० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम सुरु होत आहे. या मोहिमे दरम्यान आरोग्य विभागातील आशा सेविका, स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधणार आहेत. या शोध मोहिमे दरम्यान नागरिकांनी क्षयरोग व कुष्ठरुग्ण आजाराबाबत गैरसमज व भिती न ठेवता आपल्याला होणारा त्रास न लपवता घरी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे. जनजागृती, तपासणी व उपचार या त्रिसुत्रीने संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 25 ऑक्टोबर रोजी सदर मोहिमे संबंधाने जिल्हास्तरीय समन्वय सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.रोशन राऊत, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गोतमारे म्हणाले, कुष्ठरुग्ण व क्षयरोग हे दोन्ही आजार संपुर्ण उपचाराने बरा होवू शकतो. म्हणून नागरिकांनी प्राथमिक स्तरावर जाणवणारे लक्षणे आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जावुन तपासणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दुर्गम भाग, विट भट्टी, आश्रमशाळा, गिरणी, बांधकाम, अनाथाश्रम, वृद्धाश्रमे इत्यादी ठिकाणी सखोल सर्वेक्षण करण्यात यावे. लवकर निदान, तत्पर उपचार केल्यास क्षयरोग व कुष्ठरुग्ण नक्कीच हमखास बरा होवु शकतो. दोन्ही आजारावरील औषधी सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, सामाजिक कारणाने कुष्ठरोग लपवण्याकडे लोकांचा विशेषतः महिला भगिनीचा कल असतो. त्यामुळे आरोग्य विभागाने सोशल मिडिया, सामाजिक संस्था व इतर माध्यमाद्वारे लोकांचे प्रबोधन करून योग्य उपचाराने हा आजार बरा होतो असा विश्वास देवून जास्तीत जास्त संशयित रुग्णांची तपासणी करावी, अशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. प्रधानमंत्री व राज्याचे आरोग्य मंत्री यांचे मार्गदर्शनाखाली सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय गाठण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. रोशन राऊत यांनी मोहिमेचे सादरीकरण केले. २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या संयुक्त कुष्ठरोग व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेसाठी गृहभेटी अंतर्गत जिल्ह्यातील 13 लाख 94 हजार 114 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असुन गृहभेटी दरम्यान 2 लाख 78 हजार 823 घरांचे भेटीचे नियोजन केले आहे. त्यासाठी 1076 पथके तयार करण्यात आलेली आहेत. एक पथक एका दिवसात शहरी भागातील २५ व ग्रामीण भागातील २० घरांना भेटी देणार आहे. घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोग संदर्भात संपुर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
मोहिमेचे उद्देश :- समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करणे. सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे. क्षयरोगाचे निदाना अभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे. संशयीत क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करणे व औषधोपचार सुरु करणे. मोहिमेमध्ये प्रशिक्षीत पथकाद्वारे गृहभेट देऊन कुष्ठरोग व क्षयरोगाचे लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधणे. समाजात कुष्ठरोग व क्षयरोग विषयी जनजागृती करणे, असे या मोहिमेचे उद्देश आहे.
सभेला जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक कैलाश गजभिये, जिल्हा परिषदेचे जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिल चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुबोध थोटे, डॉ. विजय राऊत, डॉ. अमित कोडनकर, डॉ. ललित कुकडे, डॉ.विनोद चव्हाण, अवैद्यकिय पर्यवेक्षक एन.डब्ल्यु.चकोले व श्री. पडोळे तसेच लॉयन्स क्लबचे पुश्पक जसानी व रेड क्रॉस सोसायटीचे राजेश दवे उपस्थित होते.
क्षयरोग व कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करून लोकांनी जागृत होऊन आरोग्य तपासणी करुन घ्यावी. नागरिकांनी मनात कुठलीही भिती न बाळगता आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणाला सहकार्य करावे.
– जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे |