अकोला:- अर्थर वेलस्ली यांनी मराठ्यांच्या युद्धनीतीचा अवलंब करून 1815 मध्ये वॉटरलू येथे जगज्येत्या नेपोलियन बोनापार्ट चा पराभव केला होता अशी माहिती सेवानिवृत्त ब्रिटिश सैन्यअधिकारी मेजर गार्डन कॉरिगन यांनी दिली.
दरवर्षी प्रमाणे यंदाही ब्रिटिश अभ्यासकांचे 14लोकांचा समूह सिरसोली येथील युद्धभूमीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी व युद्धभूमी परिसर अभ्यासन्याकरिता आले होते यावेळी शौर्यदिन आयोजक आर्किटेक्ट अनंत गावंडे यांनी त्यांचेशी संवाद साधला.
1803 मध्ये लॉर्ड वेलस्ली यांच्या नेतृत्वात इंग्रज मराठा युद्ध झाले होते अडगांव परगणे मधील सिरसोली येथील युद्धभूमीवर 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर सात दिवस घनघोर युद्ध झाले. तोफ बंदुका याचा समोर मराठा सैनिक पारंपरिक शस्त्रांनी लढत होते.मराठा युद्धनीतीमुळे मराठा सैनिकांनी सात दिवस निकराची झुंज दिली. इंग्रजांनी लढलेल्या भारतातील युद्धात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात इंग्रज सैनिक मारल्या गेले होते. या युद्धानंतर वेलस्लीला इंग्लंडला परत पाठवण्यात आले दरम्यान 1816 मध्ये अपराजित नेपोलियन बोनापार्ट इंग्लंड वर चालून आला होता त्यावेळी या युद्धाचे नेतृत्व वेलस्लीकडे देण्यात आले नेपोलियन सोबत लढतांना त्याने सिरसोली येथे मराठ्यांनी जी युद्धनीती वापरली तीच युद्धनीती त्याने वॉटरलू येथील युद्धात वापरली आणि नेपोलियनचा पराभव केला जगतजेत्या नेपोलियनचा पराभव केल्याने वेलस्लीला ब्रिटनमध्ये अतिशय आदर व मानाचे स्थान मिळाले होते. वेलस्ली यांनी लिहून ठेवलेल्या पुस्तकांमध्ये सिरसोली येथील युद्धाचा व मराठ्यांच्या युद्धनीतीचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. या युद्धनीतीचा अभ्यास करण्याकरिता सव्वा दोनशे वर्षापासून दरवर्षी ब्रिटिश नागरिक सिरसोली युद्धभूमीवर नोव्हेंबर महिन्यात येत असतात. सैन्यात 34 वर्ष सेवा करून निवृत्त झालेले मेजर गॉर्डन काॅरीगन आज आलेल्या ब्रिटिश मंडळाचे नेतृत्व करित होते. त्यांनी मराठा सैनिकांची लढण्याची पद्धत तसेच पोशाख,फेटा,ढाल, तलवार अश्या सर्व बाबींसह युद्ध करण्याची पद्धत याबाबत त्यांच्या सदस्यांना सविस्तर माहिती दिली.तसेच अकोट येथील शौर्यदिन आयोजक व इतिहास अभ्यासक आर्किटेक्ट अनंत गावंडे, शिक्षक संदीप बोबडे,प्रा. वाल्मीक भगत, अवी डिक्कर यांचेशीही मेजर गॉर्डन यांनी संवाद साधला.त्यांच्याकडे असलेले युद्धभूमीचे नकाशे तेथील सविस्तर माहिती पुस्तक स्वरूपात होती त्याची मागणी केली असता दौरा संपल्यावर तुमच्या ईमेलवर ती पाठवून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी मेजर गार्डन यांनी दिले तसेच पुढील वर्षी 29 नोव्हेंबरला युद्धभूमीवर येऊ असेही ते म्हणाले. सव्वा दोनशे वर्षांपासून न चुकता ब्रिटिश सिरसोली युद्धभूमीवर श्रद्धांजली वाहण्याकरता येतात परंतु ज्या मराठ्यांच्या शौर्याचा अभ्यास करण्यासाठी ते येतात त्यांच्या वारसदारांना व स्थानिक नागरिकांना माहिती नाही ही मोठी खेदाची बाब आहे. नागपूरकर भोसले यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या या युद्धात सेनापती कर्ताजीराव जायले यांनी कॅप्टन केन याचा मुडदा पाडून स्वतः प्राण त्यागले होते. या युद्धात जात-पात धर्म विरहित स्त्री पुरुष युवक आबालवृद्ध यांनी सहभाग घेतला होता. गार्डन यांनी दिलेल्या माहितीनुसार या युद्धात पाच हजाराचे वर मराठा धारातीर्थी पडले होते. धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची शौर्यगाथा जगाला कळावी व त्यांच्या शौर्याला नमन करण्याकरिता दरवर्षी 29 नोव्हेंबर रोजी सिरसोली तालुका तेल्हारा येथे शौर्य दिन साजरा करण्यात येतो या उत्सवाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.