मराठी भाषेच्या विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
14

जिल्हा मराठी भाषा समितीची सभा

गोंदिया, दि.6 : मराठी भाषेचा सर्वांगिण विकास होण्यासाठी मराठी भाषेतील साहित्यासंदर्भात येणाऱ्या पिढीला माहिती करुन देणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच मराठी भाषेचे संवर्धन व व्यापक प्रचार-प्रसार होण्यासाठी प्रशासनात मराठीचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल, असे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आज येथे सांगितले.

          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 6 डिसेंबर रोजी जिल्हा मराठी भाषा समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. गोतमारे बोलत होते. उपवनसंरक्षक प्रमोदकुमार पंचभाई, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व अशासकीय सदस्य ॲड. लखनसिंह कटरे उपस्थित होते.

         जिल्हाधिकारी श्री. गोतमारे म्हणाले की, मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. पुर्वीच्या काळातील संतांच्या अभंगातून, वाङमयातून मराठी भाषेचा विकास झाल्याने आता ती समृध्द आहे. भाषेचे जेवढे अधिक ज्ञान तेवढे व्यक्तीमत्वात भर पडते. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी शाळांमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे. मराठी भाषेचा वारसा जपून ठेवण्यासाठी मराठी भाषेच्या वापरावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा. यामुळे मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होऊन विकास होईल. मराठी भाषेचा वापर व संवर्धन करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात मराठी भाषेतूनच पत्रव्यवहार करण्यात यावा. मराठी भाषेच्या वापराबाबत शासकीय कार्यालयात काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींचे निवारण करण्यात यावे. मराठी भाषा येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. प्रशासनात व दैनंदिन व्यवहारात सुध्दा मोठ्या प्रमाणात मराठी भाषेचा वापर करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

         प्रत्येकाने मराठी भाषेचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे संवर्धन व संस्कार होण्यासाठी येणाऱ्या पिढीला संतांचे व महान व्यक्तींचे साहित्य वाचायला द्यावे. जेव्हा भाषा मजबूत होते तेव्हा राष्ट्र निर्माण होते. भाषा ही राष्ट्राला उभी करीत असते. त्यामुळे सर्वांनी मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रशासकीय व इतर व्यवहारिक कामकाज मराठीतूनच करण्याचा संकल्प करुया, तेव्हाच मराठी ही व्यापक अभिव्यक्तीची भाषा होईल. मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे असे त्यांनी सांगितले.