रिसोड तालुक्यात 4 अवैध सावकाराविरोधात कारवाई

0
15

वाशिम, दि. 07 रिसोड तालुक्यातील विविध व्यक्तींकडून सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या चौकशीकरीता सहकार विभाग व पोलीस विभागाच्या 4 संयुक्त पथकाने रिसोड शहरातील केशवनगर येथील वंदना अग्रवाल, रिसोड तालुक्यातील लेहणी येथील प्रदीप तिफणे, गोवर्धन येथील परसराम सोनुने व मथुरानगर येथील नारायण भावसार यांच्यावर  6 डिसेंबर रोजी अवैध सावकारी व्यवहारासंबंधाने कारवाई करून मालमत्तेची व इतर कागदपत्रे  ताब्यात घेऊन  कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान काही ठिकाणी कथीत अवैध सावकारी व्यवहारासंबंधीत चौकशीकरीता आवश्यक असलेली कागदपत्रे, स्थावर मालमत्तेची खरेदी खते ताब्यात घेण्यात आली आहे. एका प्रकरणात कोरे बाँड, धनादेश आदी कागदपत्रेसुध्दा ताब्यात घेण्यात आली. त्यानुसार सावकारी कायदयाअंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे व अमरावतीचे विभागीय सहनिबंधक व्ही.डी. कहाळेकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईसाठी यवतमाळ येथील सहकारी संस्थेचे उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

या कारवाईत वाशिम येथील सहाय्यक निबंधक (प्रशासन) आर. आर.सावंत, सहाय्यक निबंधक एम. डी. कच्छवे, सहकार अधिकारी एम. बी.बनसोडे व मंगरूळपीरचे सहकार अधिकारी पि. एन.झळके यांनी पथक प्रमुख म्हणून काम केले. यावेळी  कारंजाचे सहकारी अधिकारी एन.के. मेहकरकर, वाशिम येथील सहकारी अधिकारी पी.आर.वाडेकर, मुख्य लिपीक डी.यू.खुरसडे, मालेगांव येथील सहकारी अधिकारी के.जी.चव्हाण, मंगरुळपीर येथील सहकार अधिकारी श्रीमती एम.के.जाधव, मानोरा येथील सहकार अधिकारी एस.पी.सांगळे, वाशिम येथील सहकार अधिकारी श्रीमती बी.ए.इंगळे, रिसोड येथील मुख्य लिपीक एस.पी.रोडगे व मंगरुळपीर येथील लिपीक केशरी राठोड यांनी यावेळी सहाय्यक म्हणून कामकाज केले.

या कारवाईकरीता रिसोड येथील प्रभारी सहाय्यक निबंधक बी. बी.मोरे आणि वाशिम येथील सहायक अधिकारी एस.जी.गादेकर यांनी आवश्यक ते नियोजन व व्यवस्था केली.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण व कारवाई करण्याकरीता सहकार विभागाचे तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालये तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा जिल्हा निबंधक (सावकारी) वाशिम कार्यालयाकडे गोपनीय स्वरुपाच्या तक्रारी दाखल करून अशा व्यक्तींची माहीती द्यावी. असे आवाहन जिल्हा निबंधक (सावकारी) दिग्विजय राठोड यांनी केले आहे.