. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम
गोंदिया, दि.7 : देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कुटूंबियांच्या जीवनातील अडी अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावे तसेच युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याकरीता त्यांच्या कुटूंबांना विविध माध्यमातून सहयोग करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाकरीता प्रत्येक अधिकारी-कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांनी सढळ हाताने सहयोग करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात (दि.7) सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्मिता बेलपत्रे, अपर पोलीस अधीक्षक नित्त्यानंद झा, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भैय्यासाहेब बेहरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गोतमारे म्हणाले, देशासाठी ज्या सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या कुटूंबासाठी लोकांच्या मनात सैनिकांप्रती कृतज्ञता असणे गरजेचे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन करण्यात येतो. माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतात 7 डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने 7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेर पर्यंत निधी संकलित केला जातो असे त्यांनी सांगितले.
आपल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणारा, आपत्तीच्या काळात देशबांधवांच्या मदतीला धावून जाणारा, उन्हातान्हाची, थंडीपावसाची व कोणत्याही अडचणीची पर्वा न करता आपली कर्तव्य चोखपणे बजावणारा देशाचा बहादुर सैनिक हा आपल्या सर्वांच्या आदराचा आणि अभिमानाचा प्रतिक आहे. परकीय शक्तीपासून देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी व देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखुन आपल्या पाठीशी भक्कमपणे अहोरात्र उभ्या असणाऱ्या या सैनिकांचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे. त्यामुळे सशस्त्र सेवा ध्वजदिन निधी संकलनात सर्वांनी सढळ हाताने सहयोग करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्मिता बेलपत्रे म्हणाल्या, सैनिकांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी व विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी वापरण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक शासकीय विभागाने आप-आपल्याप्रती या उपक्रमास सढळ हाताने सहयोग करावे. सर्व विभागाचे सहकार्य जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अपर पोलीस अधीक्षक नित्त्यानंद झा, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भैय्यासाहेब बेहरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख यांनीही यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक उध्दव नाईक, लेखाधिकारी मंदार जोशी, नायब तहसिलदार जे. एच. पोरचेट्टीवार, तलाठी श्री. चौधरी, श्री. सोनवाने, नाझर राकेश डोंगरे, सारिका बंसोड, स्मिता शेटे, अश्विनी पवार, सोनाली पाथोडे, स्नेहा मेश्राम, माधुरी मेश्राम, अनुसया नागपुरे, महसूल सहायक पुष्पा काळे, ए. एम. पारधीकर, संतोष शेंडे, आशिष भोयर, अमोल गजभिये, संदिप बडवाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सैनिक गणेश बिसेन यांनी केले. उपस्थितांचे आभार कल्याण संघटक धनराज बावनथडे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.