‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृतीसाठी गोंदियावासी धावणार…

0
18

कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 8 फेब्रुवारीला

         गोंदिया, दि.7 : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्ह्यात “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियाना दरम्यान जनजागृती व सर्वेक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे. या अभियाना दरम्यान नागरिकांनी कुष्ठरुग्ण आजाराबाबत गैरसमज व भीती न ठेवता आपल्याला होणारा त्रास न लपवता घरी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे. कुष्ठरुग्णांसोबत समाजात भेदभाव न होता सन्मानाने जगण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करावे व प्रत्येक कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होणाचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे.

       “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान पंधरवड्यात नुक्कड नाटकद्वारे जनजागृती, कुष्ठरोगमुक्त झालेल्यांचे मनोगत, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा, शाळेमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग बाबतच्या प्रतिज्ञांचे वाचन, शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोग बाबतचे संदेश, शाळा व गावांमध्ये नुक्कड-नाटक, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य व कुष्ठरोगावरील म्हणी/घोषवाक्य स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसेच कुष्ठरोग दौड मॅरेथॉनचे आयोजन इत्यादी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

       त्याचाच एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यात दिनांक 8 फेब्रुवारी रोजी कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ. रोशन राऊत यांनी दिली आहे. मॅरेथॉन रॅली सकाळी 8 वाजता जयस्तंभ चौक येथून सुरुवात होणार असून ते आमगाव रोड वरून सारस चौक जिल्हा परिषद येथे समापन होणार आहे. तरी गोंदियावासीयांनी जास्तीत जास्त संख्येने कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन कुष्ठरोग आजाराला हरविण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.रोशन राऊत यांनी केले आहे. मॅरेथॉन रॅली विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

        सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.रोशन राऊत म्हणाले, कुष्ठरोगाचे प्रमाण दर १० हजारी १ पेक्षा कमी करणे, कुष्ठरोग विकृती दर्जा २ प्रमाणे शुन्य आणणे, कुष्ठरोगाबाबत असलेली अंधश्रद्धा व गैरसमज दूर करणे, कुष्ठरोगाबाबतची जनजागृती ग्रामीण व शहरी भागातील तळागाळापर्यंत पोहोचुन कुष्ठरोगमुक्त भारत हा संकल्प साध्य करणे हा या “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियानाचा उद्देश असुन अभियानात “कलंक कुष्ठरोगाचा मिटवुया, सन्मानाने स्विकार करुया” याचा सर्वत्र जागर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

       कुष्ठरुग्ण हा आजार संपुर्ण उपचाराने बरा होवू शकतो. म्हणुन नागरिकांनी प्राथमिक स्तरावर जाणवणारे लक्षणे आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जावुन तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लवकर निदान, तत्पर उपचार केल्यास कुष्ठरुग्ण नक्कीच हमखास बरा होवु शकतो. या आजारावरील औषधी सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी सांगितले.