*शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सूक्ष्म नियोजन करा*- खासदार भावना गवळी
> कृषी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप
> महोत्सवात कृषीपूरक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व स्टॅाल्स
> कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना मिळणार मार्गदर्शन
वाशिम : शेती उत्कृष्ट करण्यासाठी झटणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना खासदार भावना गवळी यांनी कृषी महोत्सवाच्या उद्घाटनावेळी केल्या.
प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १५ फेब्रुवारीपर्यंत स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी संकुल प्रांगण,काटा रोड वाशिम येथे आयोजित कृषी महोत्सव व प्रदर्शनीला सुरुवात झाली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज खासदार भावना गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, कृषी सभापती वैभव सरनाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय चातरकर, जि.प.कृषी विकास अधिकारी गणेश गीरी, एपीएमसीचे संचालक संतोष पोफळे, निलेश मलिक, प्रमोद गंगावणे, महादेव ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येकाचा शेतीशी संबंध येतो. उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतकऱ्यांचा शेतमाल विकला गेला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी दर्जेदार पिकाचे उत्पादन करावे. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदत करावी. कृषी क्षेत्राबरोबर उद्योग वाढीसाठी देखील सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी. जिल्ह्यात पिकवल्या जाणाऱ्या शेतमालावरील प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात झाले पाहिजे. शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी सोसायटी व कंपनी यांच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. सेंद्रीय भाजीपाला पिकवण्याची गरज आहे, बचत गट सक्षम केले पाहिजे, सूचना देखील खा. गवळी यांनी यावेळी केल्या.
शेतकरी, शेतमजुरांच्या अनेक अडचणी आहेत, त्यावर मात करण्याचा विचार केला पाहिजे. शेतपिकाच्या उत्पादन वाढीसाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याला साथ देण्यासाठी प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांना स्वस्त दरात चनादाळ, तांदूळ, पीठ स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने भारत डाळ, भारत तांदूळ, भारत आटा हे स्वदेशी उत्पादन विक्रीसाठी केंद्र तयार करित आहे. हे केंद्र वाशिममध्ये व्हावे यासाठी आणि केंद्रीय भांडारासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्राला पत्र पाठवावे, असे सूचना खा. गवळी यांनी केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे म्हणाले, कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका शासनाची आहे. केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. वाशिम जिल्हा हा ‘मार्केंटिग जिल्हा’ कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावे. वाशिम जिल्हा संत्रा लागवडीत पुढे येत आहे. संत्रा लागवड व प्रक्रिया आणि बीज उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. वाशिममध्ये चिया लागवडीला चालना द्यावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस म्हणाल्या की, जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. त्यांची व्याप्ती वाढवायची आहे. सामूहिक शेतीची गरज आहे. शेतमालाचे ग्रेडिंग केले पाहिजे. शेतमालाचा दर्जा राखावा लागेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी काम करण्यात येईल. जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी प्रदर्शनीसाठी उभारण्यात आलेल्या स्टॅाल्सला भेट देवून पाहणी केली.त्यांच्याया हस्ते तृणधान्य पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले. तसेच कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, डॅा. पंजाबराव देशमुख योजनेच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे सभापती वैभव सरनाईक यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले केले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी तर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी आभार मानले.