- नोडल अधिकाऱ्यांची आढावा सभा
गोंदिया, दि.23 : भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने चांगली तयारी केली आहे. भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत, असे निर्देश भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी भंडारा योगेश कुंभेजकर यांनी दिले.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा सभेत श्री. कुंभेजकर बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगनंथम, अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, भंडारा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत पिसाळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
योगेश कुंभेजकर म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक हा एक राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी विविध यंत्रणेच्या माध्यमातून निवडणूकीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडायची आहे. निवडणुकीसाठी कामे करतांना यंत्रणेतील सर्वांनी स्वत:ला झोकून देवून काम करावे. ही कामे करतांना कोणाच्या हातून चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूकीच्या काळातील प्रशिक्षण ते मतमोजणी या दरम्यानच्या कालावधीत अत्यंत सुक्ष्म नियोजनातून आपआपली जबाबदारी पार पाडावी. निवडणूक ही सामुहिक जबाबदारी असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करणे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. निवडणूकीच्या काळात निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजकीय बाबीवर बोलू नये. जिल्ह्यात निवडणूका शांततेत पार पाडण्याची परंपरा यापुढेही कायम राहावी. निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या प्रत्येकाने निवडणूकीच्या अटी व नियमांचे वाचन करुन पालन केले पाहिजे. जिल्ह्यातील नविन मतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांच्यासह सर्व मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केले पाहिजे. निवडणूक यंत्रणेतील सर्वांनी कठोर परिश्रम घेवून ही निवडणूक यशस्वी करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा, उपलब्ध असलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती तसेच निवडणूकीसाठी लागणारे मनुष्यबळ, वाहतुक व्यवस्था याबाबतची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. मतदार जागृती अभियानाअंतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावे. दिव्यांग मतदारांसाठी विशेष जनजागृती मोहिम राबवून दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर व रॅम्सच्या व्यवस्थेसह अन्य सुविधा मतदान केंद्रावर दिव्यांगांना देण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोर. वरुणकुमार सहारे, उपविभागीय अधिकारी तिरोडा पुजा गायकवाड व तहसिलदार गोंदिया समशेर पठाण यांनी निवडणुकी संदर्भात करण्यात आलेली पुर्वतयारी बाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
सभेला नोडल अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भैय्यासाहेब बेहरे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोर. वरुग्णकुमार सहारे, उपविभागीय अधिकारी तिरोडा पुजा गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) गोविंद खामकर, समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) नंदिनी चानपूरकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी उत्तम शेटे, पाटबंधारे विभागाच्या सहायक अभियंता शिखा पिपलेवार, लेखाधिकारी संदिप बोरकर व अनिता कोनाळे यांचेसह सर्व तहसिलदार उपस्थित होते.