Home विदर्भ प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

0

अमरावती, दि. १०  : लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही. अमरावती लोकसभेसाठी मागच्यावेळेस मतदानाची टक्केवारी कमी होती. यावेळी हे चित्र बदलण्यासाठी सर्व मतदार राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदानाचे प्रमाण यंदा वाढवून ते 75 टक्क्यांपर्यंत नेतील, असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज येथे व्यक्त केला.

अमरावती लोकसभा मतदार संघ निवडणूकीच्या पूर्वतयारीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथान, विभागीय आयुक्त डॉ. निधि पांड्येय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मतदानाबाबतची नागरिकांमधील उदासीनता जाणे महत्त्वाचे आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचे प्रमाण वाढले पाहीजे. पारदर्शक आणि मुक्त वातावरणात प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे, हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. यासाठी मतदानाचा निर्धार हा शंभर टक्क्यांचा हवा. मतदान केंद्रावर मतदारांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा मिळायला हव्या. सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक आरोग्य सुविधा असतील, याची खबरदारी बाळगा. निवडणूकीचे कामकाज करताना प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आरोग्य सांभाळावे. मतदानाचा दिवस नजीक येत असल्यामुळे मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी त्यांनी मतदान केंद्रे, मतदारांची माहिती, मतदानाची ठिकाणे व तेथील व्यवस्था, माध्यम सनिंत्रण व प्रमाणिकरण समिती, प्रशिक्षण कार्यक्रम, मनुष्यबळ, आचारसंहिता कक्ष, सीव्हीजील, खर्च सनियंत्रण समिती पथक, वनविभागामार्फत तयार करण्यात आलेले चेकपोस्ट तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने विविध कक्षांचा यावेळी आढावा घेऊन संबंधितांना सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी तथा अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत सुरु केलेल्या विविध उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

Exit mobile version