Home विदर्भ अमरावती लोकसभा मतदारसंघात गृह मतदानाला आजपासून सुरुवात

अमरावती लोकसभा मतदारसंघात गृह मतदानाला आजपासून सुरुवात

0

अमरावती, दि. १२ : कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. गृहमतदानाला अमरावती मतदारसंघात आजपासून सुरुवात झाली. यावेळी दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे बॅलेट पेपरद्वारे गोपनीयता बाळगत मतदान करुन मतदानाचा हक्क बजावला.

दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये अमरावती मतदारसंघासाठी येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने 85 वर्षाहून अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी 12 डी नमुना भरून दिला, त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार  मतदान प्रक्रिया करण्यात येत आहे. मतदानाची प्रक्रिया प्राप्त झालेल्या फॉर्मनुसार दि. 14 एप्रिल दरम्यान होणार आहे. वयोवृद्ध व दिव्यांगाच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधानसभानिहाय पथक तयार करण्यात आले असून या पथकामध्ये मतदान अधिकारी, सहायक मतदान अधिकारी तसेच सूक्ष्म निरीक्षक, पोलीस व व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे.

मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सूचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये दिव्यांग व वयोवृद्धांनी आपले मत नोंदवित आहे. मतदान प्रक्रिया गोपनीयता पाळत मतपत्रिका घडी केल्यानंतर छोट्या लिफाफ्यांमध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.

०००

Exit mobile version