Home विदर्भ सिमेंट रस्त्याच्या कडा न भरल्याने अपघाताची शक्यता!

सिमेंट रस्त्याच्या कडा न भरल्याने अपघाताची शक्यता!

0

* फुलचुर ग्रामपंचायतीसह बांधकाम विभाग कंत्राटदारावर मेहेरबान
गोंदिया – कोणतेही रस्ता बांधकाम झाल्यावर रस्त्याच्या कडा भरणे आवश्यक असतानाही फुलचुर ग्रामपंचायत अंतर्गत आंबाटोली वॉर्ड क्रमांक २ येथे कंत्राटदाराने तिलांजली दिली आहे. सदर कंत्राटदारावर फुलचुर ग्रामपंचायतीसह बांधकाम विभाग मेहेरबान असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
फुलचुर ग्रामपंचायत अंतर्गत नवीन वसाहत असलेल्या आंबाटोली येथील वॉर्ड क्रमांक २ येथे श्री उईके यांच्या घरापासून ते श्री खोब्रागडे यांच्या घरापर्यंत नागरी सुविधा योजनेंतर्गत 10 लाखांच्या निधीतून रस्ता बांधकाम मंजूर झाले होते. सदर रस्ता बांधकाम ‘मार्च इंडींग ‘ मुळे मार्च महिन्यात तयार करण्यात आले. सदर रस्ता बांधकामासाठी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा एका नातलगाला सदर बांधकामाचे कंत्राट दिले. रस्ता सिमेंट काँक्रिटचा असतानाही रस्ता तयार झाल्यानंतर एकही दिवस पाणी देण्यात आले नाही. यासंबंधात नागरिकांनी तक्रार केली असता कंत्राटदाराने आपल्या माणसाला पाठविले. मात्र त्याने त्याठिकाणी येऊन सेल्फी घेत आपण पाणी टाकत असल्याचे दाखविले. सदर सेल्फी कंत्राटदाराने बांधकाम विभगातील संबंधित अभियंत्याला दाखविले. त्यानंतर मात्र या ठिकाणी कोणीही रस्त्याच्या ‘क्युरींग ‘ साठी पाणी देण्यासाठी आला नाही. पाणी शोषून घेता यावे यासाठी साधी तनिस किंवा सुती बोरा यांचाही वापर करण्यात आला नाही. मात्र आपल्या घराजवळचे काम असल्याने या भागातील नागरिकांनी या सिमेंट काँक्रिट रस्त्याला पाणी दिले. रस्ता तयार करताना रस्त्याच्या बाजूच्या कडा भरणे आवश्यक असते. असे असतानाही सदर कंत्राटदाराने एकही इंच मुरूम किंवा कोणतेही साहित्य कडा भरण्यासाठी अजूनही आणलेले नाही. या रस्त्याच्या वळणावर व इतरही ठिकाणी कडा न भरल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे रस्ता तयार झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच रस्ता मोठ्या वाहनाने रस्ता पूर्णपणे तुटलेला आहे. या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत व जिल्हा परिषद बांधकाम विभाग मात्र सदर कंत्राटदारावर मेहेरबान असल्याचे जाणवत आहे.

Exit mobile version